केजरीवाल यांच्या  जामिनावर उद्या निर्णय

कथित अबकारी धोरण घोटाळय़ाशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा निर्णय आता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होईल. या प्रकरणी काल सुनावणी अनिर्णित राहिल्याने खंडपीठ कोणतेही निर्देश न देताच उठले होते.

या खंडपीठाचे नेतृत्व करणारे न्या. संजीव खन्ना यांनीच अंतरिम जामिनाविषयी शुक्रवारी आदेश दिला जाईल, अशी माहिती आज दिली. आम्ही शुक्रवारी अंतरिम आदेश घोषित करू. अटक करण्याला दिलेल्या आव्हानाशी संबंधित याचिकेवरही त्याच दिवशी सुनावणी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

आज जीएसटीशी संबंधित प्रकरणी त्यांच्या वेगळय़ा खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. या वेळी पेंद्रातर्फे बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांना त्यांनी शुक्रवारच्या प्रस्तावित सुनावणीची कल्पना दिली. 7 मे रोजी न्या. खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. निवडणुकीची बाब लक्षात घेऊन केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयी आम्ही विचार करू शकतो, असे खंडपीठाने याआधी म्हटले होते.

 .