मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान पाहिला नाही; भाजपच्या माजी नेत्याचा प्रहार

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. पहिल्या दोन टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेल्याचा दावा विरोधकांकडून सुरू असतानाच आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान कधी पाहिला नाही, असा घणाघात यशवंत सिन्हा यांनी केला.

Yashwant Sinha यांनी शुक्रवारी एक ट्विट केले आहे. ‘मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारतीय पंतप्रधान पाहिले असून यापैकी दोघांसोबत जवळून कामही केले आहे. पण आज मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान यापूर्वी कधीही पाहिला नाही’, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले.

प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. ‘काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील’, असे मोदी राजस्थानमधील सभेमध्ये बोलले होते. त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला. याच मुद्द्यावरून आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनीही नाव न घेता मोदींवर टीका केली आहे.

सामना अग्रलेख – भाजपचे ‘मंगळसूत्र’ चोर!

यशवंत सिन्हा हे भाजपचे माजी नेते असून चंद्रशेखर आणि अटल बिहारी वायपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले होते. मात्र 2018 मध्ये त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आणि ‘देशातील लोकशाही संकटात आहे’ असे म्हणत भाजपला रामराम केला होता. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2022 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवली, मात्र द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा पराभव केला.

छत्रपतींच्या गादीपुढे मोदी कुणीच नाहीत, भाजपकडून शिवरायांच्या गादीचा अपमान; संजय राऊत कडाडले