स्तनपान करणाऱ्या महिलेला लपून पाहणाऱ्याला पकडले, बेदम मारहाणीत मृत्यू

तमिळनाडूमधल्या कोयंबतूरमध्ये 58 वर्षांच्या एका माणसाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या माणसाचा मृत्यू झाला आहे. या माणसाला एका महिलेच्या घरात लपून छपून पाहताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. ज्यावेळी हा माणूस या महिलेच्या घरात डोकावून पाहात होता त्यावेळी महिला तिच्या घरात बाळाला स्तनपान करत होती. ते पाहण्यासाठी हा माणूस घरात डोकावून पाहात होता. साईबाबा कॉलनीजवळ असलेल्या घराचे कौल काढून हा माणूस घरात डोकावत होता. त्याला पकडल्यानंतर महिलेचा पती, त्याचा भाऊ आणि भावाचा मित्र यांनी मिळून मारहाण केली होती. या मारहाणीत आणखीही काही जण असावेत असा पोलिसांना संशय आहे. मात्र तूर्तास पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही महिला तिच्या भाड्याच्या घरात बाळाला स्तनपान करत होती, तेव्हा तिला तिचा शेजारी मुश्ताक हा घराचे कौल काडून वरून पाहात असल्याचे दिसले होते. तिना आरडाओरडा केला असता मुश्ताकने तिथून पळ काढला होता. मुश्ताक त्याच्या घरी जाऊन लपला होता. महिलेने आरडाओरडा केल्याने महिलेचा पती एम राहुल ( 24 वर्षे)  त्याचा कवुंडमपालयम येथील एमजीआर नगरात राहणारा भाऊ एम मूर्ती (27 वर्षे) आणि त्याचा मित्र जी मनोज (26 वर्षे) यांनी मुश्ताकला त्याच्या घरात जाऊन फरफटत बाहेर आणले होते. या तिघांनी मुश्ताकला बेदम मारहाण केली.

जमा झालेल्या लोकांनी मध्यस्थी करत मुश्ताकची सुटका केली होती. हे प्रकरण पोलिसांना कळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी महिलेच्या पतीला आणि नातेवाईकांना मुश्ताकविरूद्ध बुधवारी तक्रार नोंदवा असे सांगितले होते. ही तक्रार नोंदवण्याच्या आधीच मुश्ताकचा मृत्यू झाला होता.  बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास, मुश्ताक हा त्याच्या घराजवळील नाल्यात मृतावस्थेत आढळला होता. याबाबत पोलिसांना कळवले असता त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोईम्बतूर मेडिकल कॉलेजला पाठवला होता.