दिल्लीच्या पथकाची टूम मिंधे गटाला भोवणार

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुती-मिंधे गटाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात महायुतीचे पदाधिकारी सहभागी होत नसल्याने दिल्लीवरून सहाजणांचे पथक आल्याची टूम मिंधे गटाने काढली. तसे प्रसिद्धिपत्रक काढले. पदाधिकाऱ्यांवर विश्वास नसल्याने प्रचार करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा होऊ लागली होती. त्यातच भाजपच्या शहराध्यक्षांनी दिल्लीचे असे कोणतेच पथक आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी नाराज झाले असून, दिल्लीच्या पथकाची टूम मिंधे गटाला भोवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील आणि मिंधे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत आहे. तर, महायुतीमध्ये उमेदवार जाहीर करण्यापूर्वी आणि नंतरही मोठी खदखद असल्याची चर्चा वारंवार होत आहे. यातूनच महायुतीचे अनेक पदाधिकारी प्रचारापासून लांब असल्याचे दिसून येत आहे. खासदार बारणेंचा प्रचार नेमका कसा सुरू आहे, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी दिल्लीचे सहाजणांचे एक पथक मावळ लोकसभा मतदारसंघात आल्याबाबतचे प्रसिद्धिपत्रक त्यांच्या टीमने काढले. मतदारसंघात प्रामाणिक व जीव तोडून काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नोंद घेतली जाणार आहे. त्यांच्या कामांची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. जे प्रचारात सहभागी झाले नाहीत, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगत ते ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये असणार आहेत. याचा सर्व अहवाल संबंधित घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. तसेच महायुतीच्या वतीने यापुढे ‘ब्लॅक लिस्ट’मधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नसल्याचा गंभीर इशारा प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आला होता.

भाजपचे, केंद्राचे पथक किंवा नेते येणार असले, तर पक्षाच्या अध्यक्षाला कळविले जाते. मात्र, आमच्याकडे अशी कोणतीही माहिती आली नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारणे यांच्या टीमने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यासाठी प्रसिद्धिपत्रक काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

दिल्लीचे पथक केवळ अफवाच
मिंधे गटाच्या खासदाराने गेल्या दहा वर्षांत आम्हाला विचारले नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच एका बैठकीत केला होता. त्यामुळे बारणे यांना तिकीट देऊ नये, ‘कमळा’च्याच चिन्हावर उमेदवार द्यावा, अशी मागणीही केली होती. मात्र, त्यांची उमेदवारी लादण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी बारणे यांच्या प्रचारापासून फारकत घेतल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. हे पदाधिकारी प्रचारापासून लांब राहिले तर मोठ्या प्रमाणात बारणे यांना फटका बसू शकतो, हे त्यांच्या टीमने हेरले. त्यातूनच दिल्लीचे जे पथक आलेच नाही, ते पथक आल्याचे प्रसिद्धिपत्रक काढून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. मात्र, मावळमध्ये दिल्लीचे पथक आल्याची केवळ अफवाच असल्याचे समोर आल्यानंतरही महायुतीचे पदाधिकारी बारणे यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.