सत्ताबदलाचे वारे विखेंना लवकर कळतात; बाळासाहेब थोरात यांचा टोला

नगरसह राज्यामध्ये महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना सत्ता कोणाची येणार हे लवकर कळते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला. त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या विदर्भ मराठवाड्यातील निवडणुकीमध्ये क्वचितच एखादी जागा भाजपला मिळेल. मात्र इतर जागा या महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. नगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ येथील सावेडी उपनगरातील पाईपला रोड परिसरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाधक्ष जयंत वाघ आणि शहराध्यक्ष किरण काळे उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, नगरबरोबरच राज्यामध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. आज वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटले यावर विचारले असता थोरात म्हणाले की, मलाही थोडी थोडी माहिती मिळाली होती. मात्र सगळ्यात गोष्टी काही उघड करायच्या नसतात. विखे यांना अगोदर कळतं की कुणाची सत्ता येणार आहे. पण त्यांना प्रवेश देताना मला विचारल्याशिवाय होणार नाही, असेही ते म्हणाले. या अगोदर सुद्धा या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक वेळेला पक्ष बदललेले आहेत. जिथे सत्ता येते तिथे जातात. हा अनुभव असल्याचाही टोला थोरात यांनी लगावला.

निलेश लंके नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते सामान्य भागातून आलेले आहे. त्यांची लढाई एका धनदांगड्या की ज्यांच्या ताब्यामध्ये अनेक संस्था आहेत, आर्थिक ताकद मोठी असलेल्यांबरोबर त्यांचा सामना आहे. त्यांना पाडण्यासाठी भाजपने आणि दिग्गज यांच्या सभा या ठिकाणी घेतल्या याचा अर्थ नक्की की निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे, असे थोरात म्हणाले.

या निवडणुकीमध्ये सुद्धा घराणेशाहीच्या अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहे. विखे यांची सुद्धा घराणेशाही आहे. त्यामुळे भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा कोणता अधिकार नाही, असेही थोरात यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरचा वाटोळ केलं, असे राधाकृष्ण विखे यांनी आरोप केला. त्यावर विचारले असता ज्यांनी गुन्हा केलेला असतो तो नेहमीच मी नाही, तो दुसऱ्यांनी केला, असे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातला हा प्रकार असल्याचाही टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.