73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; 19 जिल्हे, 40 तालुक्यांत गंभीर दुष्काळ, शरद पवारांनी मांडले भयंकर वास्तव

सुमारे 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असून 19 जिल्हे आणि 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती गंभीर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एक हजारांवर टँकर लागत होते यंदा ती गरज दहा हजार टँकरवर पोहोचली आहे असे भयंकर वास्तव मांडत, राज्यकर्त्यांचे या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून मिंधे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यामध्ये 19 जिल्हे आणि त्यातील 40 तालुक्यांत गंभीर दुष्काळ आहे तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जूनअखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होईल, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला दोनच पालकमंत्र्यांची हजेरी

दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती, परंतु त्या बैठकीला फक्त दोनच पालकमंत्री उपस्थित होते. कृषिमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु कृषिमंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या गुरुवारच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे, असे म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

दुष्काळी भागांत मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा

दुष्काळी भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवले जातेय, परंतु ते मागणीपेक्षा फारच कमी असल्याने लोकांची वणवण होत आहे, असे शरद पवार म्हणाले. मराठवाडय़ामध्ये आणि पुण्यातील काही भागांत गंभीर परिस्थिती आहे. मराठवाडय़ात 40 महत्त्वाची धरणे आहेत, परंतु पाणीसाठा फक्त 16 टक्केच शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही 81 लघु प्रकल्प आहेत, पण फक्त सहा टक्केच पाणी शिल्लक आहे. पुण्यामध्ये 50 प्रकल्प आहेत, पण त्यात 24 टक्केच पाणी उरले आहे, असे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा...

शरद पवार यांनी यावेळी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाबाबतही माहिती दिली. राज्यातील टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी पुरवठय़ासाठी सध्या 10 हजार 572 टँकर लागत आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत फक्त 1108 टँकर लागत होते. यावरून दुष्काळाच्या गंभीरतेचा अंदाज येईल, असे ते म्हणाले. पुण्यामध्ये 632 गाव आणि वाडय़ामध्ये 755 टँकर सध्या लागत आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1867 टँकर लागत आहेत, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी सरकारला गंभीर इशाराही दिला. दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा आमच्याकडे इतर पर्यायही आहेत, असे ते म्हणाले.