…तर सारे कॅरेबियन्स आनंदाने नाचतील! आंद्रे रसेलकडून पुन्हा एकदा सुनील नारायणची मनधरणी

यंदाच्या आयपीएल मोसमात एक अष्टपैलू म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या सुनील नारायणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र सुनील नारायणसारख्या एका खेळाडूची संघाला अजूनही उणीव भासतेय. त्याने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन विंडीजसाठी खेळावे. तो परतल्यावर अवघे पॅरेबियन आनंदी होतील, असा विश्वास त्याचाच संघसहकारी असलेल्या आंद्रे रसेलने बोलून दाखवत त्याची मनधरणी करण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे.

आयपीएलमधील सुनीलच्या झंझावाती कामगिरीने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आणि त्याच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या, पण सुनीलने आपण निवृत्ती मागे घेणार नसल्याचे सांगून साऱ्यांनाच निराश केले. सध्या आयपीएलमध्ये त्याच्याइतका जबरदस्त खेळ कुणालाही जमलेला नाही. त्याने 13 सामन्यांत 180 धावांच्या स्ट्राईक रेटने 482 धावा ठोकल्या आहेत तर 22 च्या सरासरीने 16 विकेट टिपून आपला जबरदस्त इम्पॅक्ट पाडला आहे.

कोलकात्यासाठी रसेलसह नारायणही खेळतोय. रसेल म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे तर सुनीलची कामगिरी पाहून मी खूप आंनदी झालोय. आयपीएलमध्ये  500 धावा करणे कुणा येरागबाळय़ाचं काम नाही. तो कोलकात्याचा प्रमुख गोलंदाजही आहे. त्याच्याच अद्भुत कामगिरीमुळे कोलकाता अंतिम फेरीत पोहोचली असल्याचे त्याने कबूल केले. या कामगिरीमुळे सुनीलने आपल्या निवृत्ती मागे घेण्याचा निर्णयाचा पुनर्विचार करावा. विंडीज संघाच्या निवड करण्यापूर्वी आम्ही सुनीलला विनंती केली होती, पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. आम्हाला त्याच्या निर्णयाचा आदर आहे, पण त्याची आजही विंडीज संघाला गरज आहे. तो या वर्ल्ड कपसाठी संघात परतला तर अवघे पॅरेबियन आनंदाने नाचतील, असेही रसेल म्हणाला.