मान्सून लवकर दाखल होतोय; पावसाळय़ात भांडुप, विक्रोळी, पवईत दरडी कोसळण्याचा धोका

मान्सून या वर्षी लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळय़ात भांडुप, विक्रोळी, पवईत डोंगरउताराखाली राहणाऱ्या झोपडय़ांवर दरडी कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या ‘एस’ विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसाळय़ादरम्यान अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची, डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने दरडी कोसळून घरांची पडझड तसेच जीवितहानी होण्याची घटना घडू शकते.

या परिसराला आहे धोका 

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतमनगर, पासपोली, जयभीमनगर तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकरनगर भाग 1 व 2, नरदासनगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते पंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमाननगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना धोका असून त्यांना नोटीस बजावली आहे.

…तर दुर्घटनेला पालिका जबाबदार नाही

स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वतःची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महापालिका प्रशासन त्याला जबाबदार राहणार नाही, असे ‘एस’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.