कोकणात उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीचे सावट

एप्रिल महिन्यापासून वातावरण तापायला सुरुवात झाली होता. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात जास्त वाढ होत नव्हती. मात्र, आता मे महिना सुरू झाल्यापासून उन्हाचे चटके असह्य होत आहेत. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या विदर्भ, मराठवाड्यातही आता पारा चांगलाच वाढला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता सोमवारपर्यंत कोकण, मुंबई, ठाणे परिसरात उष्णतेची लाट असेल. त्यानंतर पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीचे सावट असणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजनुसार विदर्भासह मराठवाड्यात 6 मे पासून पुन्हा वातावरण बदलण्याचे संकेत आहेत. मेघालय आणि मराठवाडा आणि झारखंड, ओदिशा, दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भात तयार होणाऱ्या हवेच्या दाबामुळे या भागात अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. हे अवकाळी पावसाचे सावट 10 मे पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. या काळात विदर्भ व मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि हलक्या पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठाणे, मुंबईसह कोकणात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबईमध्ये उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवारीही वातावरणात उष्णता कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह उपनगरातील तापमानात वाढ होणार आहे. मे महिना नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.