
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला बारा वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदींनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत मोदींवर खरपूस टीका केली. देशाला कायम ‘रांगेत’ ठेवणे हा मोदींचा ऐतिहासिक विक्रम असल्याचा टोला त्यांनी लगावला.
अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत गेल्या 12 वर्षांतील मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विविध कारणांमुळे रांगेत उभे राहावे लागल्याचे म्हणत दानवे यांनी एक यादीच सादर केली.
शासकीय योजना आणि केवायसीच्या नावाखाली सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले,. नोटबंदीच्या काळामध्ये स्वत:चे कष्टाचे पैसे काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. खते, पेट्रोल आणि ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले. महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आणि ई-केवायसी करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. एवढेच नाही तर कोरोना महामारीच्या काळात कोव्हिड टेस्ट, व्हॅक्सिन आणि लॉकडाऊन लागल्यानंतर मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी संघर्ष करावा लागला, याचीही आठवण दानवे यांनी करून देली.
१२ वर्षांतील सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम: देशाला कायम ‘रांगेत’ ठेवणे!
🔹बँक खाते ते KYC च्या रांगा
🔹नोटबंदीत स्वतःचेच पैसे काढण्याच्या रांगा
🔹खते, पेट्रोल अन् ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा
🔹लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी रांगा
🔹कोव्हिड टेस्ट, व्हॅक्सिन ते लॉकडाऊनमध्ये घरी…— Ambadas Danve (@iambadasdanve) June 10, 2026
ज्या देशात थोर विभूतींनी स्वाभिमान शिकवला, तिथे आज एका माणसाभोवती अंधभक्तीने रांगण्याची नवी स्पर्धा सुरू आहे. काहींना तर वाटतंय स्वातंत्र्य 12 वर्षांपूर्वीच मिळालंय! रांगेत उभे राहा, विकास येतोय! असा उपरोधिक टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.




























































