सामना अग्रलेख – भीषण दुष्काळाची चाहूल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनने दांडी मारल्यामुळे आधीच उष्णतेच्या लाटेत भाजून निघालेल्या महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. प्रशांत महासागराचे वाढलेले तापमान आणि अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरासह हिंदी महासागरातील पर्जन्यवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची स्थितीही तटस्थ असल्याने एल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याचा धोका वाढला आहे. दीडशे वर्षांतील सर्वात मोठ्या एल निनोचे हे नैसर्गिक संकट म्हणजे कमी पाऊस भीषण दुष्काळाची चाहूलच आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनता सरकारनेही यास तोंड देण्यासाठी आतापासूनच सज्ज राहायला हवे!

मृग नक्षत्राचा पूर्वार्ध संपला तरी महाराष्ट्रात मान्सूनचा अद्याप पत्ता नाही. मृगाचा 7 जूनचा मुहूर्त तर मान्सूनने हुकवलाच; पण आता 15 जून उजाडला तरी उष्णतेच्या लाटेत होरपळून निघणाऱ्या महाराष्ट्रात पावसाचे आगमन न झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जागतिक हवामान संघटनेने आधीच एल निनो ही धोकादायक हवामान स्थिती सक्रिय झाल्याचा इशारा दिला आहे. मात्र कधी कधी असे वैज्ञानिक इशारे वा हवामानाचे अंदाज निसर्गापुढे खोटे ठरतात. अनेकदा असे अंदाज खोटे ठरल्याची उदाहरणे आहेत. तथापि, यावेळी मात्र हवामान विभागाचा हा इतिहास दुर्दैवाने तंतोतंत खरा ठरताना दिसतो आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात अंदमानात मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यानंतर केरळ ते कर्नाटकपर्यंत मान्सूनचा प्रवास सालाबादप्रमाणे झाला. त्यामुळे एल निनोचे संकट दूर होईल आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेत आगमन होईल व तिथून मराठवाडा, विदर्भात मृग नक्षत्राच्या जोरदार सरी बरसतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले होते. मात्र 6 जूननंतर स्थिती बदलली. मान्सूनचा वेग अचानक मंदावला. महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवरच मान्सून अडकून पडला. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या तापमानात झालेली अनैसर्गिक वाढ म्हणजेच एल निनो इफेक्टमुळे

पावसाचे आगमन

लांबले. आधी मुंबईत प्रवेश न करता कर्नाटकातून सांगली, सोलापूरमार्गे शॉर्टकर्टने मान्सून मराठवाडा-विदर्भात प्रवेश करेल आणि नंतर मुंबईत दाखल होईल, असाही एक कयास तज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र तोही अंदाज मान्सूनने उधळून लावला. एल निनोमुळे यंदा पावसाला प्रदीर्घ विलंब होणार व एकूणच या वर्षी पर्जन्यमान कमी असणार हा जागतिक हवामान संघटनेचा अंदाजच खरा ठरताना दिसतो आहे. मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने आता शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त 22 जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून आहे. वास्तविक दरवर्षी 15 जूनपर्यंत निम्म्याहून अधिक पेरण्या एकतर संपलेल्या असतात किंवा जमिनीत वाफसा येण्यासाठी शेतकरी पेरण्यांच्या प्रतीक्षेत असतात. मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मान्सूनच्या सरी न कोसळल्याने पेरण्यांचे नामोनिशाण नाही. गेल्या 40-50 वर्षांतील सर्वात उष्ण उन्हाळा महाराष्ट्राने व देशाने यंदा अनुभवला. उष्णतेच्या या प्रकोपाने शेतशिवारे भाजून निघाली, तप्त झाली, विहिरी आटल्या, असंख्य तलाव कोरडे पडले, राज्यातील धरणांमधील जलसाठा अवघ्या 25 टक्क्यांवर आला. महाराष्ट्रात एकंदर लहानमोठी 3028 धरणे आहेत. या धरणांतील जलसाठय़ांची स्थिती धोकादायक पातळीवर खाली उतरली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांत अवघा 12.48 टक्के इतकेच पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणांचा पाणीसाठा

पाटय़ाने तळाकडे जात असल्याने महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने शेतीचे पाणी बंद करून धरणांतील पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. एक-दोन ठिकाणी कुठे तुरळक पाऊस झाला म्हणून पेरण्या करण्याची घाई करू नका, जमिनीत ओलावा टिकून राहीपर्यंत वाट पहा, अशा सूचना शेतकऱ्यांना सरकारने दिल्या आहेत. अर्थात वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या कास्तकारांना याचे ज्ञान असतेच. दोन-चार मोठे पाऊस झाल्याशिवाय तो पेरण्या करायला धजतच नाही. सुरुवातीला दणदणीत पाऊस पडला व नंतर गायब झाला तेव्हाच दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. मात्र मान्सूनने यंदा प्रारंभीच दडी मारल्याने ग्रामीण भागात कुठेही पेरण्या तर सोडाच; पूर्वतयारीचीही लगबग दिसत नाही. मान्सूनने दांडी मारल्यामुळे आधीच उष्णतेच्या लाटेत भाजून निघालेल्या महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. प्रशांत महासागराचे वाढलेले तापमान आणि अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरासह हिंदी महासागरातील पर्जन्यवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची स्थितीही तटस्थ असल्याने एल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याचा धोका वाढला आहे. दीडशे वर्षांतील सर्वात मोठ्या एल निनोचे हे नैसर्गिक संकट म्हणजे कमी पाऊस व भीषण दुष्काळाची चाहूलच आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनता व सरकारनेही यास तोंड देण्यासाठी आतापासूनच सज्ज राहायला हवे!