ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे पुण्यात दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील एक मोठा आणि रोखठोक विचार मांडणारा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी स्थापन केलेल्या युवक क्रांती दल या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात शेकडो सामाजिक कार्यकर्ते आणि खंबीर राजकीय नेते घडवले. ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते, तसेच त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्यभार सांभाळला होता.

राजकीय आणि सामाजिक चळवळींसोबतच प्रसारमाध्यमांवरील विविध चर्चासत्रांमध्ये ते आपल्या अभ्यासपूर्ण आणि रोकठोक मतांसाठी ओळखले जात. तब्येत खालावलेली असतानाही शेवटपर्यंत आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजवादी कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी ते नेहमी आग्रही असत. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.