ममता बॅनर्जींचे नेतृत्व मान्य करून पुन्हा पक्षात प्रवेश केल्यास एका तासात राजीनामा देईन; तृणमूलच्या गद्दारांना अभिषेक बॅनर्जींचे खुले आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ आणि बंडखोरी सुरू असून, या संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गद्दार नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. जे नेते पक्ष सोडून गेले आहेत, त्यांनी ममता बॅनर्जींचे नेतृत्व मान्य करून पुन्हा पक्षात प्रवेश केल्यास आपण अवघ्या एका तासात पदाचा राजीनामा देऊ, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी गद्दार नेत्यांवर भारतीय जनता पक्षाशी संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या नेत्यांनी भाजपसोबत आधीच डील केली असल्याचा दावा त्यांनी केला. आधी पक्ष सोडायचा, त्यानंतर बंडखोर गटात किंवा भाजपमध्ये सामील व्हायचे आणि खापर मात्र अभिषेक बॅनर्जींवर फोडायचे, अशी रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले. जर खरोखरच आपल्यामुळे पक्षात बंडखोरी झाली असेल, तर नेत्यांनी परत यावे, आपण लगेच पद सोडायला तयार आहोत, असेही बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाने अभिषेक बॅनर्जी यांच्या आमताला येथील पक्ष कार्यालयावर बुलडोझर कारवाई केली आहे. हे पाच मजली बांधकाम कोणत्याही अधिकृत परवानगीविना केल्याचा दावा करत प्रशासनाने तीन जेसीबीच्या साहाय्याने हे कार्यालय पाडण्यास सुरुवात केली. मात्र हे कार्यालय कायदेशीर परवानग्या घेऊनच बांधल्याचा दावा अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाने भाजपसोबत मिळून ही राजकीय सूडबुद्धीची कारवाई केल्याचा आरोप करत, याविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.