शाळकरी मुलींची छेडछाड; कर्जतमध्ये रोडरोमिओंना फटकवत पोलीस ठाण्यात वरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची पालकांनी जोरदार धुलाई करून त्यांना फटकवत पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार दहिवली परिसरात घडला. हे रोडरोमिओ गेल्या काही महिन्यांपासून दहिवली परिसरातील शाळकरी मुलींना त्रास देत होते. पालकांनी फिल्डिंग लावून या रोमिओंना पकडले आणि त्यांना चांगलाच धडा शिकवला.

कर्जत नगरपालिका हद्दीतील दहिवली येथील डोंबे विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर काही तरुणांकडून वारंवार त्रास दिला जात होता. अखेर विद्यार्थिनींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी फिल्डिंग लावून संबंधित तरुणांना रंगेहात पकडले. संतप्त पालकांनी त्यांना चोप देत कर्जत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तातडीने चौकशी हाती घेतली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार पकडण्यात आलेले काही तरुण मूळचे कर्नाटक राज्यातील असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. तसेच अशा प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

छेड काढणे आता महागात पडणार

दहिवलीतील घटनेत संतप्त पालकांनी दाखवलेल्या धाडसाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी पालकांनी थेट पुढाकार घेत रोडरोमिओंना पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पालकांनी याप्रकरणी एकजूट दाखवल्यामुळे आता मुलींची छेड काढणे टवाळखोरांना महागात पडणार आहे. या घटनेनंतर कर्जत शहरातील टवाळखोर तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.