
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला. ‘‘दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश कुणाचे होते याचे उत्तर द्या आणि केलेल्या कृत्याची जबाबादारी घेऊन राजीनामा द्या,’’ अशा शब्दांत राहुल यांनी शहांना ठणकावले.
विद्यार्थ्यांवरील हल्ल्यावर बोलण्यास अमित शहा तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अमित शहांनी सभागृहात येऊन भाषण द्यावं. काल्पनिक विषयांवर बोलावं अशी आमची मागणीच नाही. त्यांना काय वाटतं, त्यांचं काय मत आहे, यात देशाला अजिबात रस नाही. गोळ्या कुणी चालवल्या याचं उत्तर आम्हाला हवं आहे.’’
‘‘विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश अमित शहा यांचे असतील तर ते गुन्हेगार आहेत. हे आदेश त्यांनी दिले नसतील किंवा त्याबद्दल त्यांना माहीत नसेल तर गृह मंत्री म्हणून ते अकार्यक्षम आहेत. दोन्ही परिस्थितीत त्यांना पदावरून जावे लागेल. त्यामुळेच हल्ल्याचे आदेश कोणाचे होते हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्यानंतरच इतर विषयांवर चर्चा होईल,’’ असे राहुल गांधी म्हणाले. आंदोलक विद्यार्थ्यांसोबत जे काही झाले त्यासाठी पंतप्रधान मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल, ही आमची दुसरी मागणी असल्याचे राहुल म्हणाले.
मोदी-शहांमध्ये ‘ती’ धमक नाही!
‘‘पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांनी गेल्या 15 दिवसांपासून एकदाही सभागृहात येण्याची हिंमत दाखवली नाही. केलेल्या कृत्याची जबाबादारी घेण्याची धमक त्यांच्यात नाही. देशातील तरुणांवर जे निर्दयी अत्याचार झाले त्यावर काही शब्द बोलावे असेही त्यांना वाटत नाही,’’ असा संताप राहुल यांनी व्यक्त केला.
मोदींच्या जवळच्यांनीच राम मंदिर लुटले!
‘‘अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दाही अत्यंत गंभीर आहे. करोडो रुपयांची चोरी झाली आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टवर त्यांच्या अत्यंत जवळची माणसे बसवली होती. त्यांनीच राम मंदिर लुटले आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर चर्चा व्हायलाच हवी,’’ असेही राहुल म्हणाले.































































