
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यतीत होऊन परभणी जिह्यातील जिंतूर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ‘‘आरक्षण मिळत नसल्याने मी फाशी घेत आहे. सरकारने लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडावा,’’ असा मजकूर असलेली चिठ्ठी या तरुणाच्या खिशात आढळली.
गणेश आश्रोबा ठोंबरे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. गणेश ठोंबरे याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेतला. नातेवाईकांनी त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणीनंतर त्याला
डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेश हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होता. याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले असून या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






























































