लेख – अडीच हजार कोटी खर्च, पण चौपदरीकरण अपूर्णच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दयानंद पाटील

विरार-डहाणू प्रकल्पातील 91 पैकी 70 पूल पूर्ण आणि नव्या फलाटांच्या कामाचे वेळापत्रकच उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे. एकीकडे पुलांची कामे, भूसंपादन, रेल्वेमार्ग आणि इतर पायाभूत कामे सुरू असताना दुसरीकडे प्रकल्पासाठी होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. मंजूर 3,578 कोटी रुपयांच्या तुलनेत आतापर्यंत 2,697.43 कोटी रुपये खर्च झाल्याने मंजूर निधीपैकी सुमारे 75 टक्के निधी खर्च झाला आहे. तरीही संपूर्ण प्रकल्प कधी कार्यान्वित होईल? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मार्च 2023ची मूळ अपेक्षित मुदत केव्हाच उलटली. खर्च 2,697 कोटींच्या पुढे गेला. तरीही चौपदरीकरणाची अंतिम गाडी नेमकी कधी रुळावर येणार?

विरार-डहाणू रेल्वेमार्गाच्या बहुप्रतीक्षित चौपदरीकरण प्रकल्पाच्या संथ गतीबाबत यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना माहिती अधिकारातून समोर आलेल्या ताज्या माहितीत आणखी धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-3 (MUTP-3) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3,578 कोटी रुपयांपैकी तब्बल 2,697.43 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र प्रकल्पाच्या पूर्णत्वाची ठोस तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

विशेष म्हणजे विरार ते डहाणूदरम्यान नव्या रेल्वेमार्गांसाठी फलाट बांधण्याचे काम नेमके कधी सुरू झाले आणि ते कधी पूर्ण होणार, याची माहितीच उपलब्ध नसल्याचे एमआरव्हीसीने माहिती अधिकाराच्या उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे वेळापत्रक प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने प्रवासी संघटनांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अजून 21 पुलांचे काम बाकी

चौपदरीकरणासाठी नवीन रेल्वेमार्गांवर एकूण 91 पूल प्रस्तावित असून त्यापैकी 70 पुलांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमआरव्हीसीने दिली आहे. म्हणजेच अद्याप 21 पुलांचे काम पूर्ण होणे बाकी आहे.

एकीकडे पुलांची कामे, भूसंपादन, रेल्वेमार्ग आणि इतर पायाभूत कामे सुरू असताना दुसरीकडे प्रकल्पासाठी होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. मंजूर 3,578 कोटी रुपयांच्या तुलनेत आतापर्यंत 2,697.43 कोटी रुपये खर्च झाल्याने मंजूर निधीपैकी सुमारे 75 टक्के निधी खर्च झाला आहे. तरीही संपूर्ण प्रकल्प कधी कार्यान्वित होईल? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

फलाट कधी बांधणार?

आरटीआय अर्जात विरार ते डहाणूदरम्यान नवीन रेल्वेमार्गांवरील फलाटांच्या बांधकामाची सुरुवातीची तारीख आणि प्रस्तावित पूर्णत्वाची तारीख स्पष्टपणे विचारण्यात आली होती. मात्र त्यावर एमआरव्हीसीने थेट ‘Information not available’ असे उत्तर दिले आहे.

चौपदरीकरणानंतर नवीन मार्गांवर प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी फलाटांसह आवश्यक प्रवासी सुविधा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रकल्पातील फलाटांच्या कामाचेच निश्चित वेळापत्रक उपलब्ध नसणे हे प्रकल्प नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे.

आणखी किती वर्षे?

यापूर्वी उपलब्ध झालेल्या माहिती अधिकारातील माहितीनुसार, प्रकल्पाचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर प्रकल्पाची मुदत वाढत गेली. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी बाब समोर आली होती.

त्यात आता नव्या माहितीच्या अधिकारातील उत्तरामुळे आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. एका बाजूला हजारो कोटींचा खर्च, दुसऱया बाजूला 21 पुलांची अपूर्ण कामे आणि फलाट बांधकामाच्या सुरुवात व पूर्णत्वाची तारीखही उपलब्ध नाही, अशी सद्यस्थिती असल्याने चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष पूर्णत्वाबाबत संभ्रम आणखी वाढला आहे.

विरार-डहाणू मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्याच्या रेल्वेमार्गांवर मोठा ताण आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीचे अधिक प्रभावी नियोजन करता येईल, तसेच अतिरिक्त लोकल सेवांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पालघर जिह्यातील लाखो प्रवाशांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

मात्र मंजूर निधीपैकी जवळपास तीन चतुर्थांश रक्कम खर्च झाल्यानंतरही प्रकल्पाच्या महत्त्वाच्या कामांच्या पूर्णत्वाचे वेळापत्रक स्पष्ट नसेल तर उर्वरित कामे नेमक्या किती कालावधीत पूर्ण होणार? असा प्रश्न आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

मार्च 2023ची मूळ अपेक्षित मुदत केव्हाच उलटली. खर्च 2,697 कोटींच्या पुढे गेला. तरीही चौपदरीकरणाची अंतिम गाडी नेमकी कधी रुळावर येणार? याचे उत्तर मात्र अद्याप प्रतीक्षेतच आहे.