सार्वजनिक शौचालये ठरताहेत जीवघेणी; आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगरात सार्वजनिक शौचालयांच्या संदर्भातील प्राणघातक दुर्घटना पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. रविवारी गोरेगाव पूर्व येथे विषारी रासायनिक वायूच्या प्रादुर्भावामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर याआधी भांडुप आणि मानखुर्द परिसरात शौचालयांची जुनी इमारत व सेप्टिक टँक कोसळून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या सर्व दुर्घटनांमुळे मुंबईतील सार्वजनिक शौचालयांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रविवारी राम मंदिर परिसरातील शिवशक्ती नगरात एका सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेलेल्या प्रभाकर धानीवर (25) आणि भाविन देसाई (17) या दोन तरुणांचा विषारी धूर व वायू गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शौचालयाला लागून असलेल्या एका बेकायदेशीर इलेक्ट्रोप्लेटिंग व मेटल पॉलिशिंग कारखान्यातून सोडलेले रासायनिक सांडपाणी आणि विषारी वायू शौचालयाच्या ड्रेनेज वाहिनीमध्ये पसरल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी कारखान्याच्या मालकाला काल अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली. कालच्या दुर्घटनेनंतर  महापालिकेने शौचालयांचे परीक्षण सुरू केले आहे. ज्या विभागात ही घटना घडली तेथील अतिक्रमणही तत्काळ काढण्यात आले आहे. यासह महानगरपालिकेने शहरातील सर्व जुन्या सार्वजनिक शौचालयांचे आणि सेप्टिक टँकचे तत्काळ ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे निर्देश दिले आहेत.

या घटनेतील व्यक्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्या लोकांचा मृत्यू विषारी वायूमुळे झाला की पडून हे त्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

किरण दिघावकर, उपायुक्त, घनकचरा विभाग

अनधिपृत बांधकामे पाडली, मलनिस्सारण चेंबर्सची तपासणी  

पी दक्षिणचे विभागाचे वॉर्ड अधिकारी अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले की, सोमवारी महापालिकेच्या पथकाने घटनास्थळ परिसरात अनधिपृतपणे उभारलेले स्टॉल्स आणि फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली. ज्या ठिकाणाहून रसायनाची गळती झाली असे म्हटले जातेय  त्या जागी पालिकेच्या पथकाला अद्याप  पोहचता आलेले नाही. पोलिसांनी जागेच्या मालकाला अटक केलेली आहे. परिणामी स्वतंत्र तपास करण्यासाठी अधिकाऱ्यांना अद्याप कारखान्यात प्रवेश करता आलेला नाही. हायड्रोक्लोरिक अॅसिडमुळे हे रसायन शरीरात गेले असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य नाही, असे अधिकाऱयांनी सांगितले.