
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी झालेल्या मोठ्या पडझडीनंतर मंगळवारीही शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली. किरकोळ घसरणीसह उघडल्यानंतर दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये विक्रीचा दबाव वेगाने वाढला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी २२,६०० च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. बाजारातील या घसरणीमुळे अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
News Alert! Sensex tumbles 503 points to 72,260.09 in early trade; Nifty drops 151 points to 22,626.50 pic.twitter.com/782y9Rx7Zr
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2026
सेन्सेक्स आणि निफ्टीची निराशाजनक सुरुवात
सोमवारी जोरदार पडझडीनंतर सेन्सेक्स ७२,७७१ च्या पातळीवर बंद झाला होता. त्यानंतर मंगळवारी बाजाराने ७२,६३३ अंकांवर व्यवहार सुरू केला; मात्र काही क्षणांतच घसरणीचा वेग वाढला. अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरून ७२,१३६ च्या पातळीवर आला.
सेन्सेक्ससोबतच निफ्टीमध्येही मोठी घसरण नोंदवली गेली. ५० शेअर्सचा निफ्टी निर्देशांक आधीच्या बंद (२२,७८०) च्या तुलनेत किंचित घसरून २२,७३२ वर उघडला. परंतु, काही वेळातच तो २०० हून अधिक अंकांनी घसरून २२,५८० च्या पातळीपर्यंत खाली आला.
सोमवारच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
याआधी सोमवारीही भारतीय शेअर बाजारात मोठा भूकंप पाहायला मिळाला होता. दिवसभरात सेन्सेक्स १,१२४ अंकांनी कोसळून ७२,७७१ वर बंद झाला होता, तर निफ्टी २६० अंकांच्या घसरणीसह २२,७८० च्या पातळीवर स्थिरावला होता.































































