एम. एफ. हुसेन यांच्या ‘द रेड गर्ल’ चित्राचा लिलावात नवा विक्रम; तब्बल ६५ कोटी रुपयांना विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी सात दशकांपूर्वी रेखाटलेले एका दुर्मिळ चित्राचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात आला असून या चित्राला कोट्यवधींची बोली लागली आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईतील हॅमिल्टन हाऊस येथे पार पडलेल्या ‘पुंडोल्स फाईन आर्ट सेल’मध्ये हुसेन यांच्या ‘द रेड गर्ल’ (The Red Girl) या १९५२ मधील तैलचित्र तब्बल ₹६५ कोटी रुपयांना विकले गेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhima Pathak (@ridhimapathak)

लिलावापूर्वी या चित्राची किंमत ३ ते ५ कोटी रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष लिलावात या पेंटिंगने अंदाजापेक्षा तब्बल १३ पट अधिक बोली मिळवत सर्वांना थक्क केले. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, आधुनिक आणि समकालीन हिंदुस्थानी कलाकृतींच्या या ८१ लॉट्सच्या लिलावात ‘द रेड गर्ल’ ही सर्वाधिक किमतीला विकली गेलेली कलाकृती ठरली.

४८ x २३ ७/८ इंच आकाराचे हे चित्र हिंदुस्थानी आधुनिकतावादाच्या सुरुवातीच्या काळातील एक मैलाचा दगड मानले जाते. या चित्राच्या मध्यभागी लाल, मातकट रंगात रंगवलेली एक स्त्री आकृती दिसते. कंबरेला अलंकारिक कंबरपट्टा आणि कपाळावर वैशिष्ट्यपूर्ण अलंकारिक टिकली लावलेली ही आकृती प्राचीन हिंदुस्थानी शिल्पकलेशी थेट नाते सांगते.

पुंडोल्सच्या कॅटलॉगमधील नोंदीनुसार, या चित्रातील स्त्रीरूप प्राचीन भारतीय, विशेषतः मथुरा परंपरेतील ‘यक्षी’ मूर्तींची आठवण करून देते. चित्रात वापरलेला गडद लाल रंग प्राचीन भारतीय शिल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेलेल्या लाल वाळूच्या दगडाचे (sandstone) प्रतीक मानला जातो.

जरी हुसेन यांच्या चित्रांचा जागतिक विक्रम आधीच १३ दशलक्ष डॉलर्सच्या पुढे गेला असला, तरी देशांतर्गत लिलावात ६५ कोटी रुपयांचा पल्ला गाठत ‘द रेड गर्ल’ने अलिकडच्या काळातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण कलाकृतीचा मान मिळवला आहे.