
एल निनोच्या प्रभावामुळे देशभरात यंदा पावसाचे दुर्भिक्ष जाणवले. अनेक राज्यांकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले, धरणं कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे पुढील आठ-दहा महिन्यात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने 300 हून अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता तेलंगणा राज्यानेही याच दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत.
तेलंगणात पाणी आणि वीजटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील आठ ते दहा महिन्यांत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेषत: पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या भातशेतीचा एक हंगाम पुढे ढकलावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले आहे. जुलै 2027 मध्ये अपेक्षित असलेल्या पावसापर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रेवंत रेड्डी यांनी मंत्रिमंडळातील सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या अनेक दशकांत पाहिलेल्या एल निनोपेक्षा सध्याची परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील पाणी आणि वीजपुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे, असे रेड्डी यावेळी म्हणाले.
तेलंगणातील धरणांमध्ये सध्या सुमारे 200 टीएमसी पाणीसाठा असून या काळातील सामान्य साठा 462 टीएमसी असतो. कृष्णा खोऱ्यातील जलसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत 72 टक्क्यांनी, तर गोदावरी खोऱ्यातील साठा 42 टक्क्यांनी कमी झाला आहे.
सरकारच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी 13 लाख एकरांहून अधिक क्षेत्रावर भातशेती टाळली आहे. मात्र, अन्य भागांत सुमारे 53 लाख एकरांवर भातलागवड झाली आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
वीजेची मागणी वाढली
दरम्यान, ऑक्टोबर हीटमुळे वीजेची मागणीही वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये साधारणतः 15 हजार मेगावॅट असणारी विजेची मागणी 20 हजार मेगावॅटच्या पुढे गेली आहे. ही वाढ सुमारे 33 टक्के आहे. कोविड महामारीप्रमाणेच या संकटाचा सामना करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणी वाचवा, वीज वाचवा हा आपला मंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































