Breaking News – टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी 3 संशयित आरोपींना राजस्थानमधून अटक; 2 हरयाणाचे, तर एक बिहारचा रहिवासी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून तीन संशयित आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. यापैकी दोन आरोपी हरयाणातील सोनिपत, तर एक आरोपी बिहारच्या बेगूसराय येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कोटा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोटाच्या एसपी तेजस्वनी गौतम यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यानंतर आरोपींनी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (क्र. 12939) पकडली. ही एक्सप्रेस सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राजस्थानच्या कोटा जंक्शन येथे पोहोचली. आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळतात पोलीस आधीच कोटा रेल्वे स्थानकावर दबा धरून बसले होते. रेल्वे कोटा स्थानकात दाखल होताच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

रेहान उर्फ सुक्का (वय – 18, रा. ईदगाह कॉलनी, सोनीपत, हरयाणा), ऋतिक कुर्मी उर्फ रोशन फायटर (वय – 22, रा. पिपराई बेगूसराय, बिहार, सध्या रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या कोटा शहर पोलीस स्थानकात आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.

नेमके काय घडले?

टायगर श्रॉफ हा जुहूच्या पुष्पा पार्क येथे फुटबॉलची मॅच खेळण्यासाठी आला होता. मॅच संपल्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत होता. कारमध्ये तो पुढच्या सीटवर बसला होता. त्याची कार गेटच्या बाहेर पडताच बाईकवरून आलेल्या दोघांनी कारवर जवळून गोळ्या झाडल्या. त्यांनी तीन राऊंड फायर केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

टायगर श्रॉफवरील गोळीबारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…