पुण्यातील सफाई कामगाराची लेक नौदलात; श्वेता पंडितचे घवघवीत यश

पुणे येथील सफाई कर्मचारी महिलेच्या मुलीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले नेव्हीचे स्वप्न पूर्ण केले आहे. श्वेता पंडित असे या मुलीचे नाव असून ती नेव्हीची कॅडेट झाली आहे. अग्निवीर होण्यास सज्ज झाली आहे. ‘आयुष्यात कधीही हार मानायची नाही,’ या आईने दिलेल्या प्रेरणेमुळे 20 वर्षांच्या श्वेताने हे देदीप्यमान यश मिळवले आहे.

 श्वेताची आई ज्योती पंडित या 2013 पासून पुण्यातील ‘स्वच्छ’ या सफाई कर्मचाऱयांच्या स्वायत्त सहकारी संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. त्यांची लेक श्वेताचा प्रवास सोपा नव्हता. तिने हडपसर येथील साधना गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. ती प्रायव्हेट टय़ूशनचा खर्च उचलू शकत नव्हती म्हणून ती ऑनलाईन टय़ूटोरियलकडे वळली. फिटनेस टेस्टसाठी तिने भावाची मदत घेतली. ज्योती सांगतात, ती आणि तिचा भाऊ पहाटे साडेचार वाजता उठून व्यायाम करायचे. मला श्वेताचा खूप अभिमान आहे. माझ्या सहकाऱयांनाही तिचा अभिमान वाटतो. श्वेताला देशसेवा करायची आहे.

मराठी माध्यमात शिकलेल्या श्वेताला बारावीत 78 टक्के गुण मिळाले. सुरुवातीला अग्निवीर बनून नव्या प्रवासाला सुरुवात करेल. ती सहा महिने आयएनएस चिल्कावर ट्रेनिंग घेईल. त्यानंतर 14 दिवसांच्या ब्रेकनंतर ट्रेनिंगच्या पुढच्या सहा महिन्यांच्या टप्प्यांची सुरुवात करेल. पुढे तिच्या कौशल्यानुसार तिला नेव्हीमध्ये पोस्टिंग मिळेल.

आयएनएस चिल्कावर  प्रशिक्षण सुरू

सध्या श्वेता ओडिशा येथे आयएनएस चिल्कावर प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर ती कमिशन कॅडेट होईल. प्रशिक्षण सुरू करण्याआधी श्वेताकडे स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. त्यात तिचे वेटिंग लिस्टचे तिकीटही रद्द झाले होते. तिने काकांकडे मदत मागितली. काकांनी तिला विमानाचे तिकीट काढून दिले. ती ट्रेनिंग सेंटरला पोहोचली. प्रशिक्षण आणि दिवसाला दहादहा तासांचा तिचा अभ्यास सुरू असतो.