महाराष्ट्रातील विकासकामांची उद्घाटने लटकवून मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात दंग

नवी मुंबई मेट्रो पूर्ण होऊनही राज्यातल्या खोके सरकारने उद्घाटन लटकवून ठेवले. ट्रान्स हार्बर लिंक तयार झाला पण सरकार म्हणते पाच टक्के काम राहिले. डिलाईल रोडचा पूलही असाच रखडवला. अखेर दहा दिवसांनतर त्या पुलाचे उद्घाटन आम्हाला करावं लागलं. महाराष्ट्रातील अशा अनेक विकासकामांची उद्घाटने लटकवून घटनाबाह्य आणि गद्दार मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात दंग आहेत असे जोरदार तडाखे शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावले. महाराष्ट्रद्रोह करणाऱ्या गद्दारांना येत्या निवडणुकीत जनता घरी बसवेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

नागोठणे आणि इंदापूर येथे बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरूनही निशाणा साधला. या मार्गाचे  काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले. तरीही त्याची दुर्दशा संपलेलेली नाही. आता तर येथून प्रवास करणाऱ्यांना आपल्या पाठीला लेप लावायची वेळ आली आहे. रत्नागिरीत डांबरच गायब झालं आहे. सगळा निर्लज्ज कारभार सुरू असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करायला खोके सरकारकडे वेळ नाही का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय?

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (एचटीएमएल) कामाचा आदित्य ठाकरे यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, या कामाचे गर्डर लाँचिंग स्वतः उद्धव ठाकरे यांनी केले होते. आम्ही त्यावेळी नेहमी कामाचा आढावा घेण्यासाठी बैठका घ्यायचो. या प्रकल्पाचा फायदा रायगड, मुंबईला होणार आहे. ट्रान्स हार्बर लिंक  पूर्ण झाला आहे. पण आता या सरकारने पाच टक्के काम अपूर्ण असल्याचे दाखवले आहे. स्वतः राजस्थान, तेलंगणामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गरगर फिरायचं आणि काम पूर्ण होऊनही उद्घाटनासाठी तारीख द्यायची नाही, हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.

अगदी फासावर लटकवा.. पण महाराष्ट्रसाठी काम करणारच

मुंबईतील डिलाईल रोडच्या पुलाचे उद्घाटन सरकारने वेळेत केले नाही म्हणून आम्ही स्वतः हा पूल लोकांसाठी खुला केला असे सांगून आदित्य ठाकरे खळा बैठकीत म्हणाले, याप्रकरणी माझ्यावर सरकारने केस टाकली. पण काही फरक पडत नाही. अगदी फासावर लटकवलं तरी चालेल पण आम्ही महाराष्ट्रासाठी काम करणारच असे त्यांनी स्पष्टपणे सांगताच उपस्थितांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

यावेळी शिवसेना नेते व माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे यंत्रणाप्रमुख किशोर जैन, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, संपर्कप्रमुख विष्णू पाटील, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे,  महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपश्री पोटपह्डे, महाड तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, नगरसेवक अजित तार्लेकर, सरपंच सोमनाथ ओझर्डे, श्रीवर्धन विधानसभा संपर्कप्रमुख सुजीत तांदळेकर, महाड विधानसभा संपर्कप्रमुख अमित मोरे, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख आशिष फळस्कर, हनुमंत जगताप, शहरप्रमुख सुदेश कळमकर, युवा सेना जिल्हा अधिकारी चेतन पोटपह्डे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, युवती जिल्हा अधिकारी धनवंती दाभाडे, रोहे तालुकाप्रमुख समीर शेडगे, विभागप्रमुख संजय भोसले, नागोठणेच्या सरपंच सुप्रिया महाडिक, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपविभागप्रमुख संजय महाडीक, शाखाप्रमुख धनंजय जगताप, आदी उपस्थित होते. आभारप्रदर्शन किशोर जैन यांनी केले.

कोकण पदवीधर मतदारसंघ जिंकून नवा इतिहास घडवू

आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत आदित्य ठाकरे यांनी मतदार नोंदणी कशाप्रकारे सुरू आहे याबाबतही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हे महाराष्ट्रद्रोह्यांचे सरकार घालवायचं असेल तर आपल्याला नुसतं लोकसभा आणि विधानसभा नव्हे तर विधानपरिषदेत देखील आपलं बहुमत आणावं लागेल. मागच्या टप्प्यात आपण चांगलं काम केलं. नोंदणी चांगली झालेली आहे. आता कालपासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात  आपल्याला 9 तारखेपर्यंत संधी आहे. कोकण पदवीधरची निवडणूक जिंकण्यासाठी पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करावी असे आवाहन करतानाच हा मतदार संघ जिंकून नवा इतिहास घडवू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

हे खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन

राज्यातील खोके सरकार हे महाराष्ट्राचे की गुजरातचे आहे, हे कळेनासे झाले आहे. ज्याप्रमाणे गद्दार सुरतमार्गे जाऊन आले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला जात आहेत. येत्या डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन हे या खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असेल. हे चाळीस गद्दार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. 31 डिसेंबरला हे सरकार बाद होणार आणि महाराष्ट्रात परिवर्तन होणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी खेड येथील माजी आमदार संजय कदम यांच्या घराच्या अंगणात आयोजित खळा बैठकीत केला.