भाजपची सत्ता आल्यास निवडणुका, आरक्षण संपवतील! आम आदमी पार्टीचा मोदी सरकारवर हल्ला

भाजप पुन्हा सत्तेत आला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलून टाकतील. ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान मानत नाहीत. ते आरएसएसने लिहिलेले संविधान मानतात, अशा शब्दांत आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

2024ची निवडणूक शेवटची संधी आहे. जर चुकूनही पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले तर ते संविधान बदलतील, निवडणूक आणि आरक्षण संपवून टाकतील. तरुण, शेतकरी आणि महिलांचे अधिकार संपवतील, अशी भीती संजय सिंह यांनी व्यक्त केली. एकीकडे पंतप्रधान स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांना आव्हान देतात की ते स्वतः आले तरी संविधान बदलू शकत नाहीत. परंतु यावरून त्यांच्या मनात संविधान बदलण्याची इच्छा आहे, असेच दिसत असल्याचे संजय सिंह म्हणाले. गृह मंत्री अमित शहा म्हणतात, भाजप 50 वर्षे देशावर सत्ता गाजवेल. तर आरएसएसवाले म्हणतात, देशातून आरक्षण संपले पाहिजे. यावरून भाजपावाले बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान नाही तर आरएसएसने लिहिलेले संविधान मानतात, असाच होतो, असेही संजय सिंह म्हणाले.