तुमच्यात लाज उरली नाही, तुम्ही राजीनामा देणार नाही! आदित्य ठाकरे यांची मिंधे सरकारवर जहरी टीका

राज्यातील सरकारी रुग्णालयांत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला मिंधे सरकारच जबाबदार आहे. आपल्या नाकर्तेपणामुळे गोरगरिबांचा जीव जात आहे, हे दिसत असूनही मिंधे सरकारला त्याची कणभरही शरम वाटत नाही. पण, या सरकारमध्ये लाजच उरली नाही. त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत, अशी जहरी टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

काही दिवसांपासून नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील इतरही सरकारी रुग्णालयांमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग, औषधांचा तुटवडा, प्रशासकीय दुर्लक्षामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. नांदेडात गेल्या आठवड्यात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरात घाटी रुग्णालयातही 30 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. एवढे मृत्यू होऊनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या रुग्णालयांना भेट देण्यासही वेळ मिळाला नाही.

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सोमवारी छत्रपती संभाजीनगरात घाटी तसेच नांदेडात डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, रोहिदास चव्हाण, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, प्रमोद खेडकर, बबनराव बारसे, माधव पावडे, माजी खासदार सुभाष वानखेडे आदी होते. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड आणि डॉ.एस.आर. वाकोडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अधिष्ठातांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारी रुग्णालयातील मृत्यूस मिंधे सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. सरकारी अनास्था आणि औषधांचा पुरवठा वेळेवर झाला नाही. त्यामुळे निष्पाप गोरगरिबांचे बळी गेल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. सरकारने सरकारी रुग्णालयांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. औषध तसेच इतर साहित्याच्या खरेदीसाठी पुरेसा निधी देण्यात आला असता तर ही दुर्दैवी घटना टळली असती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. एवढे बळी जाऊनही सरकारला त्याची लाज वाटत नाही. रुग्णांच्या मृत्यूची जबाबदारी घ्यायला सरकार तयार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले.

परिस्थिती आताच का बिघडली
सरकारवर आरोप करण्यासाठी मी येथे आलेलो नाही, असे स्पष्ट करतानाच आदित्य ठाकरे यांनी परिस्थिती आताच का बिघडली, असा प्रश्न उपस्थित केला. कोरोनाकाळात हीच आरोग्यव्यवस्था होती, हेच आरोग्य कर्मचारी होते आणि डॉक्टरही हेच होते. संपूर्ण आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामाची त्यावेळी जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. मग आताच ही यंत्रणा कशी काय संवेदनाहीन झाली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ‘हाफकीन’ला बाजूला सारून औषध खरेदीसाठी निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या कामाचा लेखाजोखा लोकांसमोर आला पाहिजे, असेही ते म्हणाले.

अर्भकांच्या मृत्यूचे कारण समजले पाहिजे
नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूमध्ये नवजात अर्भकांचे प्रमाण जास्त असल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. अर्भकांच्या मृत्यूचे कारण कुपोषण आहे की अन्य काही हे समजले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे
घाटी हे मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मोठ्या विश्वासाने येथे रुग्ण येतात. रुग्णसंख्येच्या प्रमाणात आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या मात्र अपुरी आहे. रिक्त जागा भरण्याचे तसेच औषध खरेदीचे अधिकार अधिष्ठातांना दिले पाहिजेत. मुळात अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यास बरेच प्रश्न सुटतील, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. एकूणच सध्या राज्याचे आरोग्यच बिघडले असून याविषयी आपण अधिवेशनात नक्की आवाज उठवू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

‘शौचालय’फेम खासदाराला अटक कधी?
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मिंधे गटाच्या खासदाराने चमकोगिरी करून अधिष्ठातांसारख्या जबाबदार तसेच महत्त्वाच्या अधिकारपदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान केला. एवढेच नाहीतर त्यांना शौचालय साफ करायला लावले. ही अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. या खासदारावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, पण अजून अटक झालेली नाही. मिंधे सरकार या खासदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.