हे खोके सरकार 31 डिसेंबरला पडणार म्हणजे पडणारच! आदित्य ठाकरे यांनी खळ्यात बसून कोकणवासियांशी साधला संवाद

एक पक्ष फोडून, एक परिवार फोडून, सरकार पाडून पन्नास खोके वाटून, सगळं काही करून एक सरकार तुम्ही आमच्या डोक्यावर बसवले आहे. जे घटनाबाह्य आहे. आणि ते 31 डिसेंबरला पडणार म्हणजे पडणारच आहे. हे सरकार तुम्ही आमच्या डोक्यावर बसवले तरी कशासाठी? का राज्यकर्ते म्हणून तुम्ही आमच्यावर आक्रमण करुन आलात? जे महाराष्ट्राच्या हिताचे नाही ते सरकार नक्की कोणाचे आहे? असा खडा सवाल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी खळा बैठकीत उपस्थित करताना खोके सरकारची सालटी काढली. रत्नागिरी तालुक्यात करबुडे येथे खळा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.

खोके सरकारवर ताशेरे ओढताना शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष करतंय, उद्योगक्षेत्राकडे दुर्लक्ष करतंय, मग नक्की बळ देतंय ते कोणाला देतंय? इथे येऊन मी उद्योगक्षेत्रावर बोलणं म्हणजे काय योगायोग आहे बघा. खोके सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या दिड वर्षात राज्यात एकतरी नवा उद्योग आला आहे का? (घालवला. रत्नागिरीतला जे. के. फाईल प्रकल्प घालवला. शिवसैनिकांकडून एकच आवाज) वेदांत फॉस्कॉन पाठवला कुठे? गुजरातला. एअरबस टाटा पाठवला कुठे? गुजरातला. बल्क ड्रग पार्क पाठवला कुठे? गुजरातला. मेडिकल डिव्हाईस पार्क पाठवलं कुठे? गुजरातला. वर्ल्ड कप फायनल कुठे? गुजरातला. वर्ल्ड कप फायनल मुंबईच्या वानखेडेवर असती तर आपण जिंकली असती ना? कशाला पाठवता मग तुम्ही तिकडे सगळं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंची फक्त कर्जमुक्ती पोहोचली. या सरकारचा नवा रुपया नाही
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असा एकही तालुका नाही की जिथे त्यांचे काम पोहोचले नाही. ते केवळ मुख्यमंत्री नव्हते तर महाराष्ट्राचे कुटूंबप्रमुख होते. प्रत्येकाने त्यांना आपले कुटूंबप्रमुख मानले आहे. मी जेव्हा मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधतो तेव्हा शेतकरी मला एवढंच सांगतात, उध्दव ठाकरे यांची कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली. या सरकारचा मात्र आम्हाला एक नवा रुपयाही मिळाला नाही. हे सरकार फक्त पंचनाम्यापुरतेच आहे. जिओ टॅग करा, हे अॅप डाऊनलोड करा एवढंच या सरकारने सांगितले, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

आगामी विधानसभा आपण जिंकणार आहोतच. लोकसभेतही परिवर्तन होणार, त्याचबरोबर विधानपरिषद निवडणूकही आपल्याला खूप महत्वाची आहे. आताची कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणूक आपण जिंकायचीच आहे. त्याकरीता आपण जोमाने कामाला लागलो आहोत. किशोर जैन यांची निवडणूक यंत्रणाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. ते दररोज या मतदार नोंदणीचा अहवाल देत असतात. आपण दोनवेळा सिनेटची निवडणूक जिंकलो आहोत. पहिल्यावेळी सिनेटच्या दहापैकी आठ जागा आपण जिंकलो. दुस-या निवडणूकीत दहापैकी दहा जागा आपण जिंकलो आहोत. सिनेटच्या निवडणूकीत मतदार नोंदणीचे काम किचकट असते. ते आपण केले आहे. त्याचबरोबर आपण आता पदवीधर मतदार नोंदणीचे काम करुया. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील पदवीधरांची नोंदणी आपल्याला करायची आहे. जगातील कुठल्याही विद्यापीठाचा पदवीधर या मतदार संघात मतदार होऊ शकतो. फक्त तो मतदार संघातील रहिवासी असावा, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, सुरज चव्हाण, उपनेते आमदार राजन साळवी, पदवीधर निवडणूक प्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जि. प. चे माजी उपाध्यक्ष उदय बने, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, अभय खेडेकर, उपजिल्हा प्रमुख संजय साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डांबरचोर… डांबरचोर…
खळ्यामध्ये संवाद साधताना शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीलाच रत्नागिरीतील रस्त्यावर भाष्य केले. रत्नागिरीतील रस्त्यावरुन येत असताना रस्ता असातसा वाटत होता. मी विचारलं हे असं का आहे? त्यावर मला कोणीतरी सांगितलं की डांबर कमी पडलं. [डांबरचोर… डांबरचोर… शिवसैनिकांचे एकच उत्तर]. कोण? कुठे? मला हे आताच कळलं. आता मग तुम्हीच ठरवा त्यांचे काय करायचे ते असा मार्मिक टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.