नगर जिल्ह्यात कोरोनाचे तीन संशयित? प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्टता

नगर जिल्ह्यात कोरोनाचे तीन संशयित आढळले असून सॅम्पल पुण्याला प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे तिघे कोरोनाबाधित आहेत की नाहीत, हे स्पष्ट होईल, असे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून जेएन 1 या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. राज्यात रविवारी कोरोनाचे 131 रूग्ण आढळले आहेत. नगर जिल्ह्यात रविवारी 3 संशयित आढळले आहेत. या तिघांवर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते कोणत्या तालुक्यातील आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

रविवारी राज्यात 131 नवे रूग्ण आढळले आहेत. देशात व राज्यात कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय संख्या 701 इतकी झाली आहे. तर जेएन 1 विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 29 वर गेला आहे.