मुंबई विमानतळावर मराठी दिसणार ठसठशीत

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व देशांतर्गत विमानतळावरील नामफलक आणि इंडिकेटर्सवर मराठी ठसठशीत झळकणार आहे. सर्व फलकांवर मराठीला प्राधान्य स्थान असेल तसेच इंग्रजीप्रमाणेच मराठी व हिंदी भाषेतील नावे, सूचना व इतर मजकूर ठसठशीत दिसेल, या अनुषंगाने फलकांचे स्वरूप बदलण्यात येईल. हे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करू, अशी हमी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला दिली.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावरील फलकांवर मराठी भाषा ठसठशीत दिसली पाहिजे, प्रादेशिक भाषा म्हणून या भाषेला पहिले स्थान असावे याबाबत अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडला निर्देश द्या, अशी मागणी करीत गुजराती विचार मंचने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. विमानतळावरील अनेक फलकांवर केवळ इंग्रजी भाषा असून मराठी आणि हिंदी भाषेचा वापर टाळला आहे. तसेच काही ठिकाणी इंग्रजीच्या तुलनेत मराठी आणि हिंदी भाषेचा मजकूर लहान आकारात आहे. त्या फलकांवरील मराठी वाचणेही मुश्कील बनते, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने स्नेहल दुखले यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावरील सर्व फलकांवर मराठीला पहिले स्थान दिले जाईल, मराठीतील नावे आणि सूचना ठसठशीत दिसतील. त्या अनुषंगाने फलकांमध्ये आवश्यक तो बदल करण्याचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करू, अशी हमी प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.