सर्वसामान्यांनी ‘एक रुपया एक मत’ मोहिमेतून उभारला निवडणूक निधी; अमोल कीर्तिकर यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांना मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक निधीसाठी सर्वसामान्यांनी ‘एक रुपया एक मत’ या मोहिमातून निधी उभारला आहे. तसेच विभागातील अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन संकलित केलेल्या निवडणूक निधीचा धनादेश  अमोल कीर्तिकर यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला. लोकसभा मतदारसंघातील ओम साई मित्र मंडळ, शिवसमर्थ युवा प्रतिष्ठान, बाल मित्र मंडळ इत्यादी संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

आपल्या भावना व्यक्त करताना अमोल कीर्तिकर म्हणाले, गेली अनेक वर्ष मी समाजकारण व राजकारणात सक्रिय असताना अनेक लोकांना सहकार्य केले व त्यांच्यासोबत सुखदुःखात सहभागी झालो. त्यामुळे जनसामान्यांसोबत आपलेपणाचे घट्ट नाते तयार झाले. प्रत्येक ठिकाणी आपुलकीने स्वागत करून अपार प्रेम, विश्वास व अतूट साथ यांची प्रचीती पदोपदी येत आहे. जिव्हाळय़ाचे संबंध असणाऱया या मंडळांची कृती भारावून टाकणारी आहे तसेच जबाबदारीची जाणीव करून संघर्षाला बळ देणारी आहे.