अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद देणे हे अनधिकृत होते का? जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती अनधिकृत असल्याचे अजित पवार यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. जर असे असेल तर उपमुख्यमंत्री पदापासून तर विरोधी पक्षनेते पदापर्यंत अजित पवार यांची नियुक्ती करण्याचे पत्र जयंत पाटील यांनी दिले होते. तर हे देखील अनधिकृत होते का,असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांना प्रश्न विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, 53 आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर 2019 साली अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना हे माहीत नसावे की आमदारांच्या सह्यांचे ते पत्र चोरण्यात आले होते. त्यामुळेच अजित पवारांना 72 तासांत राजीनामा द्यावा लागला होता. त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाचे फायदे भोगले आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, अजित पवारच्या वकिलांच्या बोलण्यात सतत विरोधाभास जाणवत आहे. एकीकडे ते म्हणतात की, शरद पवारांबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही आणि दुसरीकडे त्यांनीच शरद पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक बेकायदा असल्याचे सांगत पवार यांच्याविरोधात निवडणूक आयोगात देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पक्षाचे मालक असल्याप्रमाणे शरद पवारांची वागणूक होती असे लिहिले आहे. प्रफुल पटेल यांनी सप्टेंबर 2022 रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही एक ठराव घेतला आहे. ज्यामध्ये नेमणुकीचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना आम्ही एका मताने देत आहो असे म्हटले आहे आणि एकीकडे अजित पवार यांच्यावतीने पवार यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे हे या पत्रावरून सिद्ध होते की निवडणूक आयोगासमोर करण्यात येत असलेला युक्तिवाद दिशाभूल करण्यासाठी करण्यात येत आहे. यावरून हे उघड होत आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकीकडे युक्तिवाद करताना सांगण्यात येते की शरद पवार यांच्या विरोधात आम्ही नाही आहोत असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला आहे. मग तुम्ही पक्ष का फोडत आहात? तुम्ही तुमचा पक्ष का काढत नाही असे देखील आव्हाड यांनी विचारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती तर ती नियुक्ती देखील अनधिकृत होती का? असा देखील प्रश्न यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आवड म्हणाले की, 2004 मध्ये पी.ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निवडणूक आयोगात दावा केला होता त्यावेळी निवडणूक आयोगाने निकाल देत म्हटले होते की, शरद पवार यांच्यासोबत सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संगमा यांना बोलण्याचा अधिकार नाही असे म्हटले होते. संगमा यांनी नवीन पक्ष स्थापन करून पुढे जावे, असे म्हटले होते. आजची परिस्थितीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मधील 28 सदस्यांपैकी 16 सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.