पावसाळ्यात टाळूची घ्यावी विशेष काळजी

>> मृणाल घनकुटे

टाळूची काळजी घेणे हे तुमच्या त्वचेची काळजी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाळू ही त्या बागेसारखी आहे, जिथे तुमचे केस वाढतात आणि जर ती निरोगी नसेल तर  केसही निरोगी राहणार नाहीत. जेव्हा स्कॅल्पमध्ये समस्या उद्भवतात, तेव्हा तुमच्या केसांनाही समस्या होऊ शकतात.

 पावसाळय़ात हवा ओलसर आणि चिकट होते. परिणामी आपली त्वचा निस्तेज होऊ शकते, पुरळ किंवा ऍलर्जी होऊ शकते, केसांमध्ये कोंडा होणे किंवा केसगळती अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी आपल्या केसांची मुळापासून काळजी घेणे गरजेचे आहे.

 आपल्या टाळूच्या लहान मुळांपासून केस वाढतात ज्याला हेअर फॉलिकल्स म्हणतात. ते फॉलिकल्स सेबम नावाचे तेल तयार करतात, जे आपले केस निरोगी ठेवण्यास मदत करतात, परंतु प्रत्येकाच्या टाळूवर वेगवेगळय़ा प्रमाणात सेबम तयार होतो. आपल्या केसांची चांगली वाढ होण्यासाठी ज्या भागात केस कुपातून बाहेर येतात ते स्वच्छ आणि निरोगी असणे गरजेचे आहे. जर फॉलिकल्स खूप तेलाने अडकले किंवा मृत त्वचा, कोंडामुळे अवरोधित झाले तर त्यामुळे आपले केसदेखील वाढू शकत नाहीत.  मुले आणि मुली दोघांमध्येही ही समस्या निर्माण होऊ शकते.

घाटकोपर येथील तज्ञ डर्माटॉलॉजिस्ट डॉ. सुनीता नायक यांच्या मते निरोगी टाळू गुलाबी असावी. त्याची त्वचा कोरडी नसावी.  मॉइश्चराइज्ड दिसले पाहिजे. टाळू निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला ती नियमितपणे धुऊन कंडिशन करावी लागेल आणि आठवडय़ातून एकदा तरी ती एक्सफोलिएट करावी लागेल. आजकाल टाळूची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

 समस्या कोणत्या

जेव्हा आपल्या डोक्याची त्वचा निरोगी नसते तेव्हा टाळूच्या समस्या उद्भवतात. आपण टाळूची  योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला कोंडा, कोरडी त्वचा, पुरळ उठणे, केस गळणे किंवा जास्त तेल लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

डोक्यातील कोंडा ः डोक्यातील कोंडा ही तुमच्या डोक्यावरील त्वचेची म्हणजेच तुमच्या टाळूची समस्या आहे. काही वेळा आपल्या टाळूला खाज सुटू शकते.  अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे कोंडा होऊ शकतो. जर तुम्ही आजारी असाल किंवा तणावात असाल तर कोंडा होऊ शकतो. तुम्ही ज्या प्रकारे केस स्वच्छ करता किंवा खाण्याच्या सवयी यामुळेही कोंडा वाढू शकतो.

डोक्याला खाज येणे ः केसांना चालणार नाही अशी उत्पादने वापरल्याने डोक्याला खाज सुटू शकते. टाळू असंतुलित होणे किंवा डोक्यावरील बॅक्टेरिया, घाम, तेल किंवा घाण यांच्यामुळेही डोक्याला खाज येते.

केसांची काळजी घेण्यासाठी

विशेष शॅम्पू, कंडिशनर, तेल वापरल्याने तुमचे केस निरोगी आणि मजबूत राहतात, परंतु केसांना फक्त तेल लावणे किंवा आठवडय़ातून काही वेळा धुणे हे केस निरोगी होण्यासाठी पुरेसे नाही. प्रत्येकाची टाळू वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची टाळू आहे हे शोधून काढणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या टाळूची काळजी घेण्यासाठी योग्य उत्पादने शोधू शकता आणि समस्या सोडवू शकता. प्रथम तुम्ही तुमच्या टाळूच्या प्रकारासाठी तुमच्या जवळच्या तज्ञ डर्माटॉलाजिस्टला भेट द्या. टाळूसाठी योग्य उपचारपद्धती जाणून घ्या.