मुंबईकरांनो, आज समुद्रावर जाऊ नका! साडेचार मीटर उंच लाटा उसळणार; 36 तासांसाठी ऍलर्ट

शनिवारपासून उद्या रविवारी रात्रीपर्यंत समुद्राला उधाण येणार असून 4 ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. परिणामी समुद्रकिनाऱयावर धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी उद्या समुद्रात जाऊ नये, असा खबरदारीचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र्ा विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हिसकडून देण्यात आलेल्या इशाऱयानुसार शनिवारपासूनच समुद्रामध्ये उधाणाची स्थिती राहणार आहे. ही स्थिती रविवारी रात्री रात्री 11.30 वाजेपर्यंत एकूण 36 तास राहणार असल्याने प्रचंड उंचीच्या लाटा उसळणार आहेत. समुद्राच्या नियमित अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटांमध्ये 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या 36 तासांच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळाव आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

केरळमध्ये समुद्रात वेगाने वारे वाहत आहेत. याचा परिणाम मुंबईच्या किनारी भागातही होण्याची शक्यता आहे. यामध्ये लाटांची उंची वाढणार आहे. त्यामुळे नागरिक आणि मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. – सुनील कांबळे, ‘आयएमडी’, मुंबई

किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात

सध्या शाळांना उन्हाळी सुट्टय़ा असल्याने चौपाटय़ांवर प्रचंड गर्दी होत आहे. शनिवार-रविवार ही संख्या आणखी वाढते. त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱयामुळे किनाऱयावर जीवरक्षक तैनात ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. नागरिकांना समुद्रात जाण्यापासून रोखणे आणि शिवाय पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मच्छीमारांनाही इशारा

किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱयावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून उसळणाऱया लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही. शिवाय समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचेही आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.