पश्चिम महाराष्ट्रात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; सोलापूर जिल्ह्यात भाजपची पीछेहाट

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघांत उद्या (दि. 5) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वंचितचे प्रकाश आंबेडकर, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते यांच्यात, तर माढय़ामध्ये महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी भाजपाची साथ सोडल्याने सोलापूर व माढा लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपाचे दोन आमदार प्रचारापासून अलिप्त राहिल्याने मतदारांत चर्चेचा विषय झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. स्थानिक ते देशपातळीवरील मुद्दय़ावर स्पष्ट आणि परखड भूमिका घेत मतदारांच्या विचारांना हात घालत प्रणिती शिंदे यांनी वातावरणनिर्मिती केली. दुसरीकडे भाजपला स्थानिक उमेदवार मिळत नसल्याने आणि गेल्या दोन खासदारांच्या परफॉर्मन्सवर मतदारांत नाराजी असल्याने बीडचे राम सातपुते यांना भाजपाला उमेदवारी द्यावी लागली याचा फटका बसण्याची शक्यता आहे. माढा लोकसभेतही महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विद्यमान भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

गेल्या दहा वर्षांत सोलापूर व माढय़ात भाजपाचे उमेदवार खासदार असून, अपेक्षित बदल न झाल्याने मतदारांत तीक्र नाराजी आहे. सोलापूरमध्ये भाजपाला उमेदवार मिळत नव्हता, तर माढय़ात निंबाळकर यांना तीक्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने प्रचाराच्या यंत्रणा सज्ज होत रॅली, कोपरा सभा, जाहीर सभा, मतदारांच्या भेटी यावर भर देत संपर्काचे प्रयत्न करण्यात आले.

एकीकडे मोदींचा गवगवा सुरू असताना भाजपला सोलापुरात गळती लागल्याचे चित्र होते. धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तम जानकर, संजय क्षीरसागर, तर दिलीप माने, राहुल गायकवाड, नारायण पाटील, संजय कोकाटे, भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीत प्रवेश करीत भाजपाला धक्का दिला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माळशिरस, करमाळा, अकलूज, माढा, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात भाजपाला जबर धक्का बसल्याचे महायुतीचे दोन्ही उमेदवार पराभवाच्या छायेत आले आहेत.

सोलापूर जिह्यातील भाजपाचे दोन आमदार प्रचारापासून अलिप्त

माढा मतदारसंघातील विधान परिषदेतील भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अंतर्गत नाराजीतून भाजपाचा प्रचार केला नाही, तर माळशिरसचे आमदार तथा मूळचे बीडचे असलेले राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्याने ते फिरकलेच नाहीत. सातपुतेंच्या विरोधात तीक्र नाराजी असल्याचे सांगण्यात येते.