उमेद – एड्सग्रस्तांना जपणारी `जाणीव’

>> सुरेश चव्हाण

नवऱ्याकडून `एड्स’सारख्या महाभयंकर रोगाची लागण होणं, सासर-माहेरकडच्यांनी वाळीत टाकणं, नवऱयाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांसाठी पैसे देऊन माणसं बोलवावी लागणं व केवळ नवऱ्याने नावावर ठेवलेले पैसे, दागिन्यांसाठी माहेरचा गोतावळा जमा होणं…अशा मन विषण्ण करणाऱया भावनेतून आणि आपल्यासारख्याच इतर एचआयव्ही बाधितांच्या वाटय़ाला येणाऱया भोगांच्या जाणिवेतून 2012 साली कोल्हापूर येथे सुषमा बटकडली यांनी एड्ससह एकाकी आयुष्य जगत सरकारी एचआयव्ही सेंटरमध्ये रुग्णसेवा करणाऱया रघुनाथ पाटील यांच्यासह `जाणीव’ या संस्थेची स्थापना केली.

`एड्स’सारख्या महाभयंकर रोगाशी सामना करणाऱया कोल्हापुरातील दोन व्यक्ती इतर एड्सग्रस्त रुग्णांना आधार देत आहेत. सुषमा बटकडली व रघुनाथ पाटील हे दोघे गेली 12 वर्षे हालअपेष्टा सोसत `जाणीव’ या संस्थेमार्फत त्यांच्याकडून होईल तेवढी मदत एड्सग्रस्तांना करत आहेत. या दोघांच्या कहाण्या अतिशय हृदयद्रावक आहेत. कोल्हापुरातील गडहिंग्लज येथे 2000 साली वयाच्या अठराव्या वर्षी सुषमा यांचे लग्न झाले. आप्पाची वाडी येथील कुरली हे सुषमा यांचे मूळ गाव. त्यांचे लग्न होऊन त्या गडहिंग्लजला आल्या आणि लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांच्या पतीला एड्सची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. सुषमा यांना मोठा धक्का बसला. आता आपल्या आयुष्याचं काय होणार? हा विचार त्यांचे मन पोखरू लागला. त्यांची चाचणी केल्यावर त्याही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळताच त्यांचे अवसानच गळाले. त्यांच्या सासरच्यांना कळताच, त्यांनी सुषमाताईंच्या हातचे पाणी पिण्यासही नकार दिला. दोघांसोबत बोलणे टाळले व त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र ते दोघेही घराबाहेर पडले नाहीत. शेवटी सासरकडील मंडळीच दुसरीकडे राहायला गेली.

पतीसह राहत असताना, त्यांचे पती सारखे म्हणायचे की, “आपण आत्महत्या करू या.” पण त्या तयार नव्हत्या. त्या नवऱयाला म्हणायच्या, “यात माझी काय चूक आहे. मी का आत्महत्या करू?” जवळपास नऊ वर्षे त्यांचे पती जगले. 2009 साली त्यांचा आजार अधिकच बळावला तेव्हा त्यांच्या पतीच्या लक्षात आले की, आपण आता फार काळ जगणार नाही. तेव्हा त्यांनी स्वतच्या मालकीची जमीन विकून साडेसहा लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स्ड डिपॉझिट करून सुषमाताईंच्या नावावर ठेवले. तसेच 19 तोळय़ांचे सोन्याचे दागिने नवऱयाने त्यांना दिले. काही महिन्यांतच पतीचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाला त्याचे नातेवाईक हात लावायलाही तयार नव्हते. तेव्हा पैसे देऊन बाहेरची माणसे बोलावून अंत्यसंस्कार करावे लागले.

त्या सांगतात, “नवरा गेल्यावर माझ्याकडे दागिने व पैसे आहेत, हे समजल्यावर माझ्याशी न बोलणारे माझे आई-वडील, बहीण-भाऊ भेटायला आले व आमच्याकडे रहा, असे म्हणू लागले. मलाही विश्वास वाटला, ही माझी माणसं मला सांभाळतील, आधार देतील. परंतु थोडय़ाच दिवसात बहीण माझ्याकडे आली व मुंबईत जागा घेण्यासाठी माझ्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी करू लागली. मी पैसे द्यायला तयार नव्हते. पण आई-वडील व भाऊ यांनी व्याज देईल म्हणाले. त्यामुळे मी बहिणीला पैसे दिले. दोन महिन्यांनी बहीण परत आली व गोड बोलून माझे 19 तोळय़ांचे दागिने तिच्या नावावर गहाण ठेवले. काही दिवसांनी तिने माझ्या तीन लाखांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर अडीच लाखांचे कर्ज काढले. कोणाचाच आधार नाही आणि या आजारातून वाचेन की नाही, याचाही भरवसा नव्हता. त्यामुळे पैसे, दागिने ठेवून तरी काय करणार, असा विचार माझ्या मनात येत होता.”

याच काळात सुषमाताई कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात एड्सवरचे औषध आणण्यासाठी जात होत्या. तिथेच त्यांची ओळख रघुनाथ पाटील यांच्याशी झाली. ते 2006 पासून एचआयव्हीसह जगत आहेत व 2009 पासून एचआयव्ही सेंटरमध्ये विनामोबदला एचआयव्हीग्रस्तांची सेवा करत आहेत. सुषमाताईंप्रमाणेच रघुनाथदादांची कहाणीही दुर्दैवी आहे. जेव्हा त्यांना एड्सची लागण झाल्याचे कळले, तेव्हा त्यांची पत्नी, दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. आता आपलं सगळं संपलं, आता जगण्यात काहीच अर्थ नाही म्हणून रघुनाथदादांनी झोपेच्या गोळय़ा घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पण त्यामधून ते वाचले. तीनदा केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांनी मरणाचा विचार सोडून दिला. उरलेलं आयुष्य एड्सग्रस्तांची सेवा करण्यात घालवायचे, असे ठरवून खेडय़ापाडय़ांतून येणाऱया एड्सग्रस्त रुग्णांसाठी सेवा देण्याचे ठरवले. सुषमाताई त्यांच्या कामात त्यांना सहकार्य करायला तयार झाल्या. दररोज दोघे एचआयव्ही सेंटरला जाऊन एचआयव्ही बाधीत रुग्णांना मदत करायला लागले. एकवेळ उपाशी पोटी राहून त्यांचे काम चालू होते. 2010 पासून आजपर्यंत कोल्हापूर जिह्यात एचआयव्हीसह जगणाऱयांची आकडेवारी 12 हजारांच्या आसपास आहे. या रुग्णांच्या अडचणी इतक्या भयावह आहेत की, बऱयाच जणांना एकवेळचं अन्न मिळण्याचीही सोय नव्हती. एचआयव्ही बाधित महिलांना घरात व बाहेर अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळे. अशा महिला व मुलांना `संजय गांधी बालसंगोपन’, `आम आदमी योजना’ यांची माहिती देणे, त्यांना औषध प्रणाली समजावून औषध कशी घ्यावीत याचे मार्गदर्शन त्यांनी सुरू केले.

या कालावधीत सुषमाताईंनी बाहेरून एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. रघुनाथ पाटील यांनीही बीए केले. एचआयव्ही होऊ नये व एचआयव्ही होण्याची कारणे, याबद्दल समाजात प्रबोधन व जनजागृती ते करत आहेत. 2012 साली दोघांनी मिळून `जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. गेली 12 वर्षे या संस्थेचे काम लोकांच्या सहकार्याने सुरू आहे. `एड्सग्रस्त व्यक्तीही सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकते,’ हा संदेश हे दोघे एड्सग्रस्तांना देत आहेत. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत त्यांना मिळालेली नाही. एचआयव्हीसह जगत असलेल्या व्यक्तींना त्यांचे जीवन जास्तीत जास्त आनंदात, आरोग्यदायी जगता यावे यासाठी हे दोघेही प्रयत्न करत आहेत.

[email protected]