धरती आबा; भगवान बिरसा मुंडा

>> सुशांत धुर्वे

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात जनजाती, वनवासी समाजाचे खूप मोठे योगदान राहिलेले आहे. या जनजाती क्रांतिवीरांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. जनजाती अस्मितेचे नायक असलेल्या बिरसा मुंडा यांच्या कार्याचा हा परिचय…

हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांतील जनजाती आपल्या सुपुत्रांचे गौरव गीत गाताना एक स्वर्णीम नाव समोर येते – बिरसा मुंडा, ज्यांना केवळ आपले जनजाती बंधूच नव्हे, तर संपूर्ण समाज श्रद्धेने व प्रेमाने बिरसा भगवान म्हणून हात जोडतात.

जनजाती समाजाने देशाला अनेक रत्ने दिली. मणिपूरचे जादोनांग, नागाराणी गाईदिनल्यू, राजस्थानचे राणा पुंजा भिल्ल, आंध्र प्रदेशचे अल्लुरी सीताराम राजू, तेलंगणाचे कोमराम भीम, बिहार झारखंडचे तिलका मांझी, सिद्धो-कान्हो, जतरा भगत, केरळचे पाळसी राजा, तलक्कल चंदू, महाराष्ट्राचे वीर राघोजी भांगरे, वीर भागोजी नाईक, वीर बाबुराव शेडमाके, नाग्या कातकरी, आसामचे शंभुधन फुंग्लोसा ही त्यातील काही प्रमुख नावे. जनजाती समाजातील या वीर पुरुषांबद्दल संपूर्ण देशालाच गौरव आहे. भगवान बिरसा मुंडा या सर्वांचे प्रतीक आहेत.

बिरसा मुंडा यांचा जन्म छोटा नागपूर (झारखंड) मधील उलिहातू गावात 15 नोव्हेंबर 1875ला झाला. वडील सुगना मुंडा व आई करमी निर्धन असल्याने दुसऱ्या गावात मजुरी करीत असत. बिरसांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. बिरसांचे बालपण इतर सामान्य मुलांप्रमाणेच गावात खेळण्यात, जंगलात भटकण्यात व गुरे चारण्यात गेले. आपल्या मुलांनी खूप शिपून मोठे व्हावे अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे बिरसांनी जयपाल नाग या शिक्षकाकडून अक्षरओळख आणि गणिताचे प्राथमिक शिक्षण घेतले. तेथे त्यांचा एका ख्रिश्चन धर्मप्रचारकाशी संबंध आला, जो भोळ्याभाबडय़ा जनजातींना शिक्षणाच्या आमिषाने एकत्र करून धर्मप्रचार करीत असे. जनजाती समाजाच्या गरिबीचा व सरळ स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना ख्रिश्चन बनवून इतर समाजापासून वेगळे करण्यात व फूट पाडून राज्य करण्याचे त्यांचे ध्येय होते. बुर्ज मिशन शाळेत बिरसांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढचे शिक्षण चाईबासा येथील लुथरन मिशन शाळेत झाले. शाळेच्या वसतिगृहात जेवणाबरोबर गोमांस वाढले जाई. मुंडा परिवारात गाईला माता म्हणून पुजत असल्याने बिरसांनी गोमांस खाण्यास नकार दिला. ख्रिश्चनांचे षडयंत्र ओळखून त्यांच्या मनात ख्रिश्चनांबद्दल घृणा उत्पन झाली. त्या अवघ्या 15 वर्षांच्या तेजस्वी बालकाने ख्रिश्चन धर्मप्रचारक नोटटला स्पष्टपणे बजावले की, ‘‘साहेब, ख्रिश्चन मिशनरी यांची टोपी एकच आहे’’, म्हणजे इंग्रज अधिकारी व पादरी सारखेच अत्याचारी आहेत. असं म्हणून बिरसा हे चाईबासा सोडून परत आपल्या गावी परतले.

बिरसा आता खूप बदललेले होते. 1891 ला बिरसा बंदगाव इथे आले जेथे त्यांचा चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांशी संबंध आला. त्यांच्या भजनाने व कीर्तनाने प्रभावित होऊन बिरसांना आपला इतिहास, धर्म व संस्कृतीची ओळख झाली. अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले. त्यांच्या अनुयायांची संख्या वाढू लागल्याने स्वाभाविकपणे एक जन आंदोलन हळूहळू आकार घेऊ लागले. अन्याय ब्रिटिश सरकार आणि जनजाती समाजावर समाजाचे शोषण करणारे जमीनदार यांच्या विरोधात असंतोष निर्माण होऊ लागला. इंग्रज अधिकारी, ख्रिस्ती पादरी आणि त्यांना सामील असणारे शोषक जमीनदार हे आपले शत्रू असल्याचे बिरसा मुंडा यांनी आपल्या अनुयायांना पटवून दिले.

चलकद गावात एक आश्रम, एक आरोग्य निकेतन आणि एक क्रांती केंद्र उभारले गेले. मोठय़ा संख्येने लोक चलकदला येऊ लागले. इंग्रज सत्तेला विरोध करण्यासाठी प्रथम एक असहकार आंदोलन ‘उलगुलान’ सुरू झाले. त्यामुळे बिरसा मुंडा यांचे या संपूर्ण परिसरात खूप मोठे नाव झाले. बिरसांना लोक ‘धरती आबा’ म्हणू लागले.

एकाएकी बिरसाचा वाढलेला प्रभाव बघून इसाई मिशनरी घाबरले. एक नवीन हिंदू संन्यासी राजा बनून जनजातींना इंग्रज सत्तेविरुद्ध भडकवीत आहे, अशी तक्रार त्यांनी इंग्रज सरकारकडे केली. ब्रिटिश सरकारने ताबडतोब बिरसांच्या अटकेचा आदेश दिला. इंग्रज पोलीस अटक करण्यास चलकदला पोहोचले, पण ग्रामीण लोकांचा प्रचंड विरोध पाहून अटक न करता परत गेले. इंग्रज सरकारने विशेष बैठक घेऊन बिरसाचा ‘उलगुलान’ काहीही करून दाबून टाकण्याचा आदेश दिला. 25 ऑगस्ट 1895 ला फसवणुकीने इंग्रज सरकारने बिरसांना अटक केली व झारखंडच्या हजारीबाग जेलमध्ये आणले, सबळ पुराव्या अभावी 30 नोव्हेंबर 1897 ला बिरसांना मुक्त केले गेले. एव्हाना सर्व जनजाती समाजमनात स्वातंत्र्याच्या धगधगत्या प्रेरणा घेऊन तयार असल्याचे दिसून आले. धनुष्यबाण घेऊन आंदोलनाची योजना तयार केली गेली. इंग्रज समर्थक जमीनदारांना कर देणे बंद करून जमिनी सावकारमुक्त करणे, जंगल अधिकार परत मिळविणे आदी मागण्या केल्या गेल्या. इंग्रज व इसाई मिशनरीविरुद्ध घृणा व आक्रोश वाढू लागला. बिरसांचे मुख्य सेनापती वीर गया मुंडा यांच्या नेतृत्वाखाली बुर्ज मिशन आणि बंदगाव मिशनवर हल्ला केला गेला. रांचीच्या जर्मन मिशनवरदेखील हल्ला झाला.

9 जानेवारी 1900 रोजी बिरसांनी जोजोहातू या गावाजवळ डोंबारी पहाडात घेतलेल्या सभेत हजारो लोक बिरसांची गीते म्हणत कपाळावर चंदनाचा टिळा लावून हातात झेंडा घेऊन एकत्र झाले. इंग्रज सरकारचा कमिशनर स्ट्रीटफिल्ड याला ही बातमी समजल्यावर त्याने सर्व पहाडाला वेढा घालून अंदाधुंद गोळीबार केला. एका बाजूला बंदूक व दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण आणि दगडगोटे अशा घनघोर युद्धात हजारो लोकांच्या रक्ताने पहाड रंगला गेला. जालियनवाला बाग हत्याकांडपेक्षाही भयानक असे हे डोंबारीचे हत्याकांड होते. शेवटी इंग्रजांनी डोंबारी पहाड काबीज केला, पण जननायक बिरसा त्यांच्या हाती लागले नाही. बिरसांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली गेली व त्यांच्या अटकेसाठी रु. 500/- इनाम घोषित झाले. शेवटी गुप्तचरांमुळे व घरभेद्यांमुळे 3 फेब्रुवारीला बंदगाव येथे बिरसांना पकडण्यात इंग्रज प्रशासनाला यश आले. त्यांना साखळदंडाने बांधून रांची जेलमध्ये आणले गेले. त्यांच्या अटकेची बातमी वणव्याप्रमाणे सर्वत्र पसरल्याने लोक सर्व पेटून उठले.

9 जून 1900 या दिवशी स्वतंत्रता महानायक भगवान बिरसा मुंडा यांचा रांची जेलमध्ये रहस्यमय मृत्यू झाला. भगवान बिरसांनी हिंदुस्थानी संस्कृती, जनजाती अस्मिता, जल, जंगल, जमीन यांसाठी आयुष्याच्या केवळ 25व्या वर्षी आत्मबलिदान केले व संपूर्ण समाजाला एक नवी दिशा दिली. धर्मांतर करून जनजाती संस्कृती नष्ट करण्याचे ख्रिश्चनांचे प्रयत्न जसे सुरू आहेत तसेच त्यांना विरोध करण्याचे कार्यदेखील बंद झालेले नाही. भगवान बिरसांचे बलिदान आम्हा सर्वांना स्वधर्म रक्षणाची प्रेरणा देत राहील.

त्यांची जयंती आमच्या जनजाती समाजाचा गौरव दिन आहे. ज्या सर्व महापुरुषांनी पूर्ण समाजाला जोडण्याचे काम केले आहे, त्या सर्व वीरांची आज आपण आठवण करून हे पवित्र कार्य पुढे नेण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे.

(लेखक विदर्भातील आदिवासी क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत.)