स्वयंपाकघर – सुगरण लीला आजी

>> तुषार प्रीती देशमुख

41 वर्षे सातत्याने एकाच कुटुंबाच्या स्वयंपाकघराची जबाबदारी स्वीकारून त्या सर्वांना सुग्रास भोजनाचा आस्वाद देऊन धष्टपुष्ट ठेवण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणाऱया लीला आजी. इतरांच्या स्वयंपाकघराला आपले मानून घरातील आर्थिक जबाबदारी स्वीकारणाऱया अशा महिलांचे खरोखर खूप कौतुक वाटते.

योगिताला सहज फोन केला तेव्हा कळलं की, तिला खूप बरं नाहीये. लगेच माझी दुचाकी गाडी काढली आणि तिचं घर गाठलं. घराची बेल वाजवली तेव्हा एका आजीने दरवाजा उघडला व धावत एका खोलीत शिरल्या. तेव्हा लक्षात आलं त्या किचन एप्रन घालून होत्या. योगिताच्या तब्येतीची विचारपूस करून झाली. तेवढय़ात आजीने आम्हाला भाज्यांचे गरमागरम चविष्ट सूप प्यायला दिले.

लीला माझावाला चहा? लीला माझावाला ब्रेकफास्ट? लीला माझे कपडे? त्यांची एका खोलीतून दुसऱया खोलीत अशी घरभर हसतमुखाने वेगाने भ्रमंती चालूच होती. पुन्हा आजीने आमच्यासाठी डोसे-चटणी दिली. मग तिची औषधं घेऊन आल्या. मधूनच त्यांनी प्रेमळ आवाजात विचारलं खाल्लं का दोघांनी? तर थोडय़ा वेळाने रागीट आवाजात काय गं घेतल्यास का गोळय़ा? असे स्वरातले चढउतार ऐकताच योगिताने ताबडतोब गोळय़ा घेतल्या.

माझी त्यांना भेटण्याची व त्यांच्याशी गप्पा मारण्याची उत्सुकता जाणून शेवटी योगिताने त्यांना बोलावून माझी ओळख करून दिली, “ही आमची सगळय़ांची लाडकी हक्काची लीला. ही नसती तर आमचं काय व कसं झालं असतं कुणास ठाऊक? आमच्या घराच्या स्वयंपाकघराची तसंच संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर असते.”

योगिताने मला तिच्या सासूबाई (फोंडाघाट फार्मसीच्या मालकीणबाई) रमा शांताराम परुळेकर, वय वर्षे 93 यांची ओळख करून दिली. तेव्हा लीला आजी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आल्या होत्या.
योगिताची परवानगी घेऊन लीला आजीशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या स्वयंपाकघरात घुसखोरी केली. स्वयंपाकघरात पदार्थांचा नुसता घमघमाट सुटला होता. एका बाजूला आमटी, बाजूला भाजी आणि दुसऱया एका बाजूला पुलाव शिजत होता. स्वयंपाक करता करता आजीकडून त्यांचा जीवन प्रवास उलगडला.

“शिक्षण झालं नव्हतं त्यामुळे कोण नोकरी देणार? लहानपणी आईकडून स्वयंपाक शिकायला मिळाला म्हणून सगळे पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवायला शिकले होते. माझी एक नातलग सुनंदा आम्रे यांच्याकडे तांदूळ निवडण्याचं काम करायला यायची. तेव्हा हे कुटुंब स्वयंपाकीणबाई शोधत आहे हे कळताच त्यांनी माझं नाव सुचवलं. आज गेली 41 वर्षं मी या कुटुंबासाठी जेवण करण्याचं काम करत आहे. माझ्या प्रत्येक सुखदुःखात त्यांचा असलेला आधार तितकाच जिव्हाळय़ाचा आहे.”

लीला आजीच्या आयुष्यात अनेक दुःखांचे डोंगर येऊनसुद्धा त्या सदैव हसतमुख असतात. लहान वयातच काही प्रमुख जबाबदाऱया त्यांच्यावर पडल्यामुळे कष्ट करून पैसे कमवावे लागले. “इतरांच्या घरात जाऊन स्वयंपाक करून ते पदार्थ त्यांना खाऊ घालणं ही मोठी जबाबदारी होती. देवी अन्नपूर्णेची कृपा की, मी बनवलेले सगळे पदार्थ त्या सगळय़ांना आवडले आणि मी परीक्षेत पास झाले. रोज वेगवेगळय़ा पदार्थांची माहिती घेऊन वेगवेगळय़ा चवीचे, वेगवेगळय़ा जातींचे असे अनेक पदार्थ अगदी त्यात आंतरराष्ट्रीय पदार्थदेखील शिकले. तुमचे यूटय़ूब व्हिडीओ बघून त्यात थोडा बदल करून ते सगळय़ांसाठी बनवते. एखादा दिवस जरी मी या स्वयंपाकघरात आले नाही तर मला करमत नाही. त्यामुळे हे स्वयंपाकघर म्हणजे माझं दुसरं घरच आहे.” त्या भावुक होऊन बोलत होत्या.

घरात कुणीही पाहुणे किंवा गावाकडची कितीही मंडळी आली तरी त्यांना त्या चिडचिड न करता प्रेमाने खाऊपिऊ घालतात. 41 वर्षे सातत्याने एकाच कुटुंबाच्या स्वयंपाकघराची जबाबदारी स्वीकारून त्या सर्वांना सुग्रास भोजनाचा आस्वाद देऊन धष्टपुष्ट ठेवण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणाऱया लीला आजी व अशा अनेक महिला ज्यांनी मेहनतीने स्वयंपाकाचे काम स्वीकारून आपल्या संसाराची आर्थिक जबाबदारी स्वीकारली. या सगळय़ांना मानाचा मुजरा.

[email protected]