मल्टिवर्स – ट्रान्सेडेन्स

>> ड़ॉ  स्ट्रेंज

ट्रान्सेडेन्सच्या मदतीने अतर्क्य, अविश्वसनीय अशा गोष्टी प्रत्यक्षात उतरवणे हा अनेक साय-फाय चित्रपटांचा आवडता विषय आहे. यापैकी काही जुन्या चित्रपटांनी भविष्यात वर्णन केलेले, पडद्यावर साकारलेले अनेक शोध पुढे प्रत्यक्षात उतरल्याचेदेखील आपण पाहिले आहेत. वेली फिस्टरचा ‘ट्रान्सेडेन्स’ हा चित्रपट मानवता आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्ष फार प्रभावीपणे समोर आणतो. ट्रान्सेडेन्सचा मराठी अर्थ आहे आक्रमण आणि हा अर्थ आपण संपूर्ण चित्रपटभर अनुभवत राहतो हे विशेष. यातील मुख्य संशोधकाची भूमिका जॉनी डेप हा गुणी अभिनेता अक्षरश जगला आहे.

विल कास्टर अर्थात जॉनी डेप हा एक प्रख्यात संशोधक. त्याची बायको एवलिनदेखील त्याच्या तोलामोलाची संशोधक आहे. हे दोघेजण त्यांचा मित्र असलेल्या मॅक्सच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या प्रयोगात गुंतलेले आहेत. विल आणि त्याच्या टीमला एक असा सुपर कॉम्प्युटर बनवायचा आहे, जो माणसाच्या मेंदूचा 100 टक्के वापर करण्यास सक्षम असेल. असा कॉम्प्युटर जेव्हा प्रत्यक्षात निर्माण होईल तेव्हा जगाला जणू एक नवा मानवी देव मिळेल असे विल एका सेमिनारमध्ये मोठय़ा आत्मविश्वासाने सांगतो.

विलचे हे स्वप्न कितीही उदात्त असले तरी काही संस्था आणि संघटनांचा मात्र विलच्या या संशोधनाला मोठा विरोध आहे. विलचे संशोधन प्रत्यक्षात उतरल्यास मानवी जीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. हे संपूर्ण जग तंत्रज्ञान आणि मशीनच्या कह्यात जाईल अशी त्यांना भीती असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विरोधात काम करणाऱ्या या संघटनांपैकी एक असलेली I.F.T. ही संघटना विलवर प्राणघातक हल्ला करते. मात्र विल यातून कसाबसा बचावतो. मात्र विलला ज्या गोळीने मारलेले असते, ती गोळी रेडिओ अॅक्टिव्ह असते आणि तिच्या दुष्परिणामांमुळे आता विलचे एकेक अवयव काम करणे बंद करू लागलेले असतात. या प्रकरणात आता FBI चादेखील प्रवेश होतो.

मृत्यूच्या दारात असलेल्या विलचे संशोधन जिवंत राहावे, ते पूर्णत्वास जावे यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून विलचा मेंदू तो तयार करत असलेल्या सुपर कॉम्प्युटरशी जोडावा असा विचार त्याची बायको एवलिन मांडते. मात्र विचारी मॅक्स त्याला विरोध करतो आणि एवलिनला सबुरीचा सल्ला देतो. मात्र काहीशी भावनेच्या भरात वाहिलेली आणि विलच्या तंत्रज्ञानाला साकार करण्याच्या वेडाने पछाडलेली एवलिन शेवटी विलचा मेंदू त्या सुपर कॉम्प्युटरबरोबर कनेक्ट करते. मृत झालेला विल आता सुपर कॉम्प्युटरच्या रूपात पुन्हा परत येतो आणि चित्रपटाला एक वेगळेच वळण लागते. एवलिनचे मनसुबे कळल्यानंतर आणि I.F.T. आणि FBI दोन्ही तिच्या मागावर निघतात. I.F.T. ला संशोधन कायमचे नष्ट करायचे असते आणि FBI ला त्याचे संरक्षण करायचे असते.

सुपरपॉवर बनलेल्या विलच्या मदतीने एवलिन एका सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेते. इकडे सुपर कॉम्प्युटरशी जोडला गेलेला विल जगभरातील सगळ्या माहिती साठय़ाला आपल्यात डाऊनलोड करून घेत असतो. बघता बघता विल जगातील सर्वात उच्च अशा कृत्रिम बुद्धिमत्ता + मानवी मेंदूची सांगड बनतो. तो स्वतची एक अद्ययावत प्रयोगशाळा उभी करतो. काही काळात तो इतका निष्णात बनतो की, या प्रयोगशाळेत जगातील कोणत्याही आजारावर उपचार तो शक्य करून दाखवायला लागतो.

आता जगभरातील अनेक व्याधिग्रस्त विलकडे यायला लागतात. तो सर्वांवर योग्य ते उपचार करून त्यांना धडधाकट तर बनवतोच, पण हे रुग्ण आता पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि सुदृढ बनलेले असतात. त्यांच्या जखमा, किरकोळ दुखापती आपोआप बऱ्या व्हायला लागतात. विल या सगळ्या लोकांचा वापर आपल्या कामासाठी, विविध प्रयोगांसाठी करायला लागतो आणि एवलिन हादरते. तिला आता विलच्या मनसुब्यांविषयी शंका यायला लागते. गोंधळलेल्या एलविनच्या जोडीला मॅक्स, FBI आणि I.F.T. पोहोचतात आणि संघर्षाला सुरुवात होते. विलला नक्की काय हवे असते? एलविनला सत्य उमगते का? विलला रोखण्यात यश येते का? हे सगळे पडद्यावर अनुभवण्याचा आनंद नक्की चुकवू नका.