पाकसंस्कृती- स्वयंपाकघराची ओढ

 

>>तुषार प्रीती देशमुख

 

आईसाठी किंवा घरातल्या गृहिणीसाठी स्वयंपाकघर तिचं माहेर असतं. तिथे आईच्या पदराची ऊब असते, रडण्यासाठी हक्काचा खांदा असतो, आनंद व्यक्त करण्याचं आभाळ असतं, राग व्यक्त करण्यासाठीचा कोपरा असतो. हे सगळं काही स्वयंपाकघरातल्या त्या चार भिंती अनुभवत असतात आणि आपल्याशी मायेने नि:शब्दपणे संवाद साधत असतात. असं स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं हृदयच असतं

स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घरातील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय… स्वयंपाक करणाऱयाला तर स्वयंपाकघर प्रिय असतंच, पण स्वयंपाक न करणाऱयालादेखील ते तितकंच प्रिय असतं, ते कसं? स्वयंपाकघरात आई, बायको, बहीण… स्वयंपाक करत असतानाच अनेकदा आपल्याला तिच्याकडून काही ना काहीतरी हवं असतं. हे कुठे ठेवलं आहेस? ते मिळत नाही गं…अशी आरडाओरड करत असतो. तिने आपल्यासाठी ताबडतोब धावत यावं यासाठी हा सगळा अट्टहास असतो. पदार्थाला फोडणी देताना होणाऱया आवाजात किंवा कुकरच्या शिट्टीच्या आवाजात तिला आपला आवाज ऐकू आला नाही की, आपली पावलं आपसूकपणे स्वयंपाकघराच्या दिशेने वळतात.

तिच्यासाठी स्वयंपाकघर तिचं माहेर असतं. तिथे आईच्या पदराची ऊब असते, रडण्यासाठी हक्काचा खांदा असतो, आनंद व्यक्त करण्याचं आभाळ असतं, राग व्यक्त करण्यासाठीचा कोपरा असतो. हे सगळं काही स्वयंपाकघरातल्या त्या चार भिंती अनुभवत असतात आणि आपल्याशी मायेने नि:शब्दपणे संवाद साधत असतात.

लहानपणापासून मी कायम आईचा पदर धरून असायचो. त्यामुळे मंडईत जाऊन भाजी, मासे, फळं कशी खरेदी करावीत, चांगल्या भाज्या कशा ओळखाव्यात हे सारं पाहता आलं. तिचं स्वयंपाकघराशी असलेलं नातं अगदी जवळून मला अनुभवता आलं. स्वयंपाक करताना मी तिच्या आजूबाजूलाच असल्यामुळे कोणत्या पदार्थाला कशा पद्धतीची फोडणी दिली तर तो पदार्थ रुचकर बनेल हे शिकलो. शेगडी प्रज्वलित करण्यापासून तव्यावर हाताला चटका न लागता पोळी शेकण्यापर्यंत सगळे शिकलो, ऋतूप्रमाणे-सणावारानुसार कोणता पदार्थ कधी व का करावा, आपली खाद्य संस्कृती आणि त्यातले बारकावे आईकडून शिकत गेलो. आई स्वयंपाक करता करता माझा अभ्यास घ्यायची. त्यामुळे स्वयंपाकघरात एक कोपरा पकडून अभ्यास व्हायचा आणि पाककौशल्याचे संस्कारही घडायचे.

आईने चहापासून जेवणातील अनेक पदार्थ करायला मला शिकवले. त्यामुळे आमच्या घरातील स्वयंपाकघर हेच माझे ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट बनले आणि माझी आई त्या इन्स्टिटय़ूटची सर्वेसर्वा, मार्गदर्शक होती. आईच्या निधनानंतर वयाच्या 13व्या वर्षी याच स्वयंपाकघराने मला सांभाळून घेतले. स्वयंपाकघराच्या या चार भिंतींनी मला आईची माया दिली. घरातील सर्वांसाठी स्वयंपाक करण्याची संपूर्ण जबाबदारी आजीच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर होती. ती मी सहजपणे पेलू शकलो ते निव्वळ आईबरोबर माझ्या स्वयंपाकघराशी आलेल्या नात्यामुळे. आईची आठवण काढत स्वयंपाक करताना डोळ्यांतून पाणी आले की, याच स्वयंपाकघराने माझे अश्रू पुसले. या चार भिंतींनी माझ्याशी संवाद साधला. यातूनच मग मी एक ठरवले की, लहान मुलांना जेवण बनवण्याचे प्रशिक्षण द्यायचे. त्यांच्यामध्ये स्वयंपाकघराची ओढ निर्माण करून द्यायची. लहानपणापासूनच सवय लागली की, जेवण बनवणे हे काम न वाटता आनंदाची प्रािढया बनेल. तसेच वेळ पडलीच तर त्यांना स्वतचे पोट भरण्यासाठी साधेसोपे पदार्थ बनवता येतील.

जसे माझे माझ्या स्वयंपाकघराशी जिव्हाळ्याचे नाते आहे तसे तुमचेही असेलच ना?

n [email protected]

(लेखक शेफ व युटय़ूबर आहेत.)