दुष्काळ, लम्पीचे सावट असून बैलपोळा उत्साहात

सध्या नगर जिह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात लम्पीने कहर केला असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आज या परिस्थितीतही शेतकऱयांनी मोठय़ा उत्साहात आणि आनंदात श्रावणी बैलपोळा साजरा केला. यावेळी शेतकऱयांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजा आकर्षक रंगात सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला आणि त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. शेतकऱयांनी बैलांच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.

यंदा सर्वत्र दुष्काळाचे सावट असून, कमी पावसामुळे शेतीची कामे कमी झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे लम्पीने सर्वत्र कहर माजविला आहे. या पार्श्वभूमीवर शेतामध्ये वर्षभर कष्ट करणारा लाडका सर्जा व राजा यांचा खऱया अर्थाने मानाचा दिवस म्हणजे बैलपोळा हा सण ओळखला जातो. यानिमित्ताने सकाळपासूनच बळीराजाची लगबग सुरू होते. बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची सजावट करण्यात आली. शिंगाला रंग लावून त्यावर बाशिंग बांधून त्यांच्या पाठीवर झूल टाकण्यात आली. त्यानंतर गावागावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

बैलांच्या पाठीवर दिले जाणारे संदेश गावाला प्रेरणा देणारे होते. मिरवणूक झाल्यानंतर सर्व शेतकरी गावातील मंदिर परिसरात एकत्र येतात. तेथे सर्वजण बैलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. घरी आल्यावर सुवासिनींनी या सर्जा-राजाला ओवाळले गेले. त्यानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविल्यानंतर बळीराजाने दिवसभर धरलेला उपवास पुरणपोळीचे जेवण करून सोडला जातो.

यांत्रिकीकरणाच्या काळात पोळा सण हा ग्रामीण भागात मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्याकडे बैलजोडय़ा नाहीत, त्या शेतकऱयांनी मातीच्या बैलाची, तर काहींनी ट्रक्टरची पूजा केली. हिंदू-मुस्लिम समाज एकोप्याने हा सण सर्वत्र साजरा करतात.

सावकाराकडून कर्ज घेत साजरा केला सण

गेल्या जून महिन्यापासून शेतकरी राजा पावसाची वाट पाहत आहे. थोडय़ाशा रिमझिम पावसावर सोयाबिन व कापसाची लागवड केली होती; परंतु निसर्गराजाने पाठ फिरविल्याने पिके जळून गेली. घरातील थोडीफार असलेली पुंजी पिकासाठी वापरली. त्यामुळे शेतकऱयांकडे पैशाची वाणवा असल्याने बैलपोळा सण साजरा करणे अवघड होते. काही शेतकऱयांनी सावकाराकडून कर्ज काढून हा सण साजरा केला. यंदा पाऊस नसल्याने मनासारखा सण साजरा न करता आल्याची खंत शेतकऱयांनी बोलून दाखविली.