अभिप्राय – कल्पनेतून साकारलेली सत्य प्रतिमा

>> अस्मिता येंडे

व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे, यासाठी मानवी मनावर विविध संस्कार केले जातात, अनेकविध मूल्यांची जाणीव करून दिली जाते. समाजात वावरताना आपली वैचारिक भूमिका कशी असावी, आचरण कसे असावे, आपली वाणी आणि विचार शुद्ध, निर्मळ असावेत, असे मूल्यशिक्षणाचे धडे प्रत्येकाने गिरवले आहेत.

लहानपणापासून आपण भूतदया हा शब्द ऐकला असेल, अर्थात प्राणिमात्रांवर दया करावी, मुक्या जीवांवर दया करावी, हा अर्थ आपल्याला माहीत आहे. पण भूतदया या शब्दाचा मूळ गर्भितार्थ जाणून न घेता शब्दश अर्थ घेतला तर? भुतावर दया! बापरे हा नुसता विचार केला तरी पाचावर धारण बसेल. लेखक सुनील पांडे यांनी ही संकल्पना विचारात घेऊन भूतदयेच्या भिन्न अर्थातून विलक्षण प्रचिती देणारी कादंबरी साकारली आहे. कादंबरीचे नाव आहे ‘भूतदया‘. कादंबरीच्या शीर्षकापासूनच वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत. कादंबरीचे कथानक हे लेखकाच्या कल्पनेतून साकारलेले असले, तरी वाचक त्यात मग्न होतो, इतक्या सहजतेने त्यांनी ही कादंबरी कल्पनाविस्तारित केली आहे. राहुल, अंजली आणि प्रिया ही या कादंबरीतील मुख्य पात्रे आहेत. पैकी एम. ए. झालेला राहुल हा नानांचा होतकरू मुलगा. पण नानांच्या पैशाला महत्त्व देण्याच्या कंजुष स्वभावामुळे राहुलला पुढील शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे तो आपला परंपरागत हॉटेल सांभाळण्याचे काम करतो. वडिलांच्या या चेंगट स्वभावामुळे वैतागून राहुल स्वतचे घर सोडून गंगापूरला जाण्याचा निर्णय घेतो. या प्रवासात त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. सगळे सामानही चोरीला जाते. आता राहुलसमोर शून्यापासून सुरुवात करण्याचे आव्हान असते. तिथे त्याची भेट होते अंजलीशी. एका सुस्थित घरातील ही मुलगी, प्रेमाखातर घर सोडून आलेली अंजली, तिच्यासोबत नेमके असे काय घड़लेले असते, असे कोणते सत्य आहे जे तिला तिच्या वडिलांना आणि बहिणीला सांगायचे असते आणि राहुल अंजलीला तिच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कशा प्रकारे मदत करतो, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचावी लागेल. साधी- सरळ वाक्यरचना, ओघवती निवेदनशैली, त्यातील भावविस्तार, वातावरणनिर्मिती, मिश्किल तसेच वेधक संवाद, पात्रांचे बारकाईने केलेले चित्रण, कादंबरीचा अवकाश नेमक्या शब्दात सामावलेला आहे, एक प्रकारे आपण चित्रपट पाहतोय की काय, असा भास निर्माण करणारी ही कादंबरी आहे.

भूतदया – कादंबरी
लेखक : सुनील पांडे
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे मूल्य : 200 रुपये