कायदा – सुव्यवस्थेचे तीनतेरा, सलमानच्या घरावर गोळीबार; बिष्णोई गँगचा हात

मिंधे सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर आज पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. चार गोळय़ा झाडून हल्लेखोर पसार झाले. एक गोळी सलमानच्या घरावर लागली आहे. गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान घरीच होता अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, बिष्णोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

सलमान खान हा वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. आज पहाटेच्या सुमारास हल्लेखोर हे मोटारसायकलवरून आले. त्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला. गोळीबार केला ते पिस्तूल परदेशी बनावटीचे असल्याचे समजते. गोळीबाराच्या घटनेनंतर फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांना एक जिवंत काडतूस आढळून आले आहे. गोळीबार नेमका कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. गोळीबाराचा तपास एटीएसदेखील करत आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. पोस्ट करणाऱयाने तो बिष्णोई गँगचा असल्याचा दावा केल्याचे समजते.

बिष्णोई टोळीच्या रडारवर आला

1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीट शिकार हत्येप्रकरणी बिष्णोईने सलमानला धमकी दिली होती. बिष्णोई समाजात काळवीट पवित्र मानले जाते.

– हल्लेखोर हे हरयाणा किंवा राजस्थान या परिसरातील असल्याची शक्यता आहे. गोळीबाराची घटना समजताच वांद्रे आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गॅलेक्सीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. पोलिसांनी आतापर्यंत चार सुरक्षा रक्षकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. तपासासाठी स्थानिक पोलीस आणि क्राईम ब्रँच अशी 20 पथके तयार केली आहेत.

धमकीचे पत्र

सलमान खानला बिष्णोई गँगकडून धोका असल्याने त्याला मुंबई पोलिसांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. 2018 मध्ये बिष्णोई आणि गोल्डी ब्रारने सलमानवर हल्ला करण्यासाठी आपले शूटर मुंबईत पाठवले होते. लॉरेन्स गँगचा शूटर 2018 मध्ये मुंबईतदेखील आला होता. 2022 मध्ये सलीम खान हे मार्ंनग वॉकला गेले असता त्यांना एकाने पत्र आणून दिले. गायक सिद्धू मुसेवालासोबत जे झाले ते सलमानसोबत करू असे त्या पत्रात नमूद होते. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी सलमान खानला धमकीचा ई-मेलदेखील आला होता. धमकीप्रकरणी बिष्णोई गँगच्या एकाविरोधात गुन्हा नोंद केला होता. गँगस्टर ब्रारला सलमानशी बोलायचे आहे असे त्या ई-मेलमध्ये नमूद केले होते.

सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद

पोलिसांकडून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले आहे. त्यात दोन्ही हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. एका हल्लेखोराने काळे आणि सफेद टी-शर्ट तर दुसऱयाने लाल टी-शर्ट घातले आहे. या दोघांबाबत महत्त्वाचा तपशील पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. या दोघांनी रोहित गोदाराच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचा संशय आहे. गोदाराला अनमोल बिष्णोईने सुपारी दिल्याचेही धागेदोरे पुढे येत आहेत. त्या आधारे तपास सुरू आहे.

अब की बार गोळीबार सरकार

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर जी घटना घडली ती धक्कादायक असून असा भररस्त्यात गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मिंधे सरकारवर निशाणा साधला. काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपच्या आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करण्याची यांची हिंमत होत असेल तर रस्त्यावर गोळीबार करायला सत्ताधाऱयांना फार काही वाटणार नाही, असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तानात सरबजित यांच्या मारेकऱयाची हत्या
इस्लामाबाद, दि. 14 (वृत्तसंस्था) – आयएसआयच्या इशाऱयानुसार पाकिस्तानच्या तुरुंगात पैद असलेला हिंदुस्थानी नागरिक सरबजित सिंग यांची हत्या करणाऱया अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. लाहोरमध्ये ही घटना घडली. सरफराजने कोट लखपत तुरुंगात सरबजीत यांची पॉलिथिनच्या सहाय्याने गळा दाबून आणि मारहाण करून हत्या केली होती. ते हिंदुस्थानी गुप्तहेर असल्याचा दावा करण्यात आला होता. हेरगिरीच्या नावाखाली सरबजीत सिंग यांचा छळ करण्यात आला होता.