महेश गायकवाड यांच्या शरिरातून 6 गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश, ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया

उल्हानगरमध्ये शुक्रवारी रात्री हिल लाईन पोलीस ठाण्यातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटातील शहर प्रमुखावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात घडल्याने राजकीय वर्तुळात वेगळे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरा महेश गायकवाड यांना ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकामार्फत शस्त्रक्रिया पार पडली.

या शस्त्रक्रियेत महेश गायकवाड यांच्या शरिरातून 6 गोळ्या काढण्यात आल्या तर साथीदार राहुल पाटील यांच्या शरीरातून दोन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यावेळी एकूण 10 राऊंड फायर करण्यात आले होते. त्यातील सहा राउंड हे महेश गायकवाड यांना लागले, तर दोन राहुल पाटील आणि दोन गोळ्या या चुकल्या असल्याच्या प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं त्याच वेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनाबाहेर बाहेर कार्यकर्त्यांमध्ये आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ थांबवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाहेर गेले असता हा संपूर्ण प्रकार त्या दालनामध्ये घडला. ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोळ्यांचा आवाज ऐकून आतमध्ये गेले त्यावेळेस गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या छातीवर बसून बंदुकीने हल्ला करत असल्याचं निदर्शनास आले आणि यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी शिताफीने गणपत गायकवाड यांच्या हातातून परवानाधारक पिस्तूल हिसकावून घेतले. पोलीस स्थानकामध्ये घडलेल्या प्रकार अत्यंत धक्कादायक असून सरकारवर चांगलीच टीका होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

दरम्यान, या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तपासांती काय नेमकं समोर येतंय? हा हल्ला पूर्वनियोजित होता का? या संदर्भात देखील चौकशी आता पोलीस करत आहेत.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे मुडदे पाडलेत; संजय राऊत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

तिघांना अटक

दरम्यान या प्रकारानंतर गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी सध्या गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे. तर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील कळवा पोलीस स्थानकात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे.

Ganpat Gaikwad Arrest – उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाडसह तिघांना अटक