‘चांद्रयान-3’ उतरलेल्या ठिकाणाचं ‘शिवशक्ती’ नामकरण; 23 ऑगस्ट आता ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’, मोदींची घोषणा

‘चांद्रयान-3’ उतरलेल्या ठिकाणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शिवशक्ती’ असे नामकरण केले आहे. ‘चांद्रयान-3’ चंद्रावर उतरले तो 23 ऑगस्ट हा दिवस इथून पुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाईल. तसेच 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी ‘चांद्रयान-2’ने आपल्या पावलांचे ठसे सोडले ते ठिकाण ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा मोदींनी केली.

बुधवार 23 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी ‘चांद्रयान-3’चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरवणारा हिंदुस्थान चौथा, तर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला.

दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी मायदेशी परतले. मायदेशी येताच मोदींनी दिल्ली न गाठता ते थेट बंगळुरूला पोहोचले. येथे त्यांनी ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांची भेट घेतली. पंतप्रधानांनी ‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या यशाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांशी संवाद साधला.

23ऑगस्ट रोजी हिंदुस्थानने चंद्रावर तिरंगा फडकवला. त्यामुळे इथून पुढे हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा मोदींनी केली.

‘चांद्रयान-3’ बुधवारी 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. त्यांनी तिथून ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांच्या यशाचा सोहळा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहिला होता आणि त्यांनी वैज्ञानिकांचे कौतुकही केले. आता मोदी मायदेशी परतले असून त्यांनी तात्काळ ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांची भेट घेत त्यांचे कौतुक केले.

चंद्रावर उमटले अशोकस्तंभ आणि ‘इस्रो’ लोगोचे ठसे; 26 किलोचे प्रज्ञान रोव्हर बाहेर आले