चंद्रावर उमटले अशोकस्तंभ आणि ‘इस्रो’ लोगोचे ठसे; 26 किलोचे प्रज्ञान रोव्हर बाहेर आले

‘चांद्रयान-3’च्या लँडरमधून सहाचाकी आणि 26 किलो वजनाचे प्रज्ञान रोव्हर यशस्वीपणे बाहेर आले. याचा पहिला व्हिडीओ ‘इस्रो’ने शुक्रवारी एक्सवरून (ट्विटर) शेअर केला आहे. प्रज्ञान रोव्हरने गुरुवारी चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणे सुरू केले होते. लँडिंगच्या 14 तासांनंतर गुरुवारी सकाळी इस्रोने रोव्हर बाहेर आल्याचे सांगितले. इस्रोचे विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरले.

अशोकस्तंभ आणि इस्रोच्या लोगोचे ठसे चंद्राच्या मातीत उमटले
प्रज्ञान रोव्हरच्या मागे दोन चाकांत हिंदुस्थानचे राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि इस्रोच्या लोगोचे ठसे आहेत. ज्या क्षणाला रोव्हर चंद्रावर उतरले. त्याच वेळी या दोन चाकांमधून चिन्हांचे ठसे चंद्राच्या मातीत अलगदपणे उमटले. रोव्हरमध्ये दोन पेलोडसुद्धा लावलेले आहेत. जे पाणी आणि अन्य किमती धातूंचा शोध घेणार आहेत. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बंगळुरूला जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणार आहेत.