‘चांद्रयान-3 ची रचना आणि यश पाहून, अमेरिकेच्या तज्ज्ञांनी हिंदुस्थानला दिला होता सल्ला…’; इस्रो प्रमुखांनी दिली माहिती

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी रविवारी सांगितलं की, चांद्रयान-3 अंतराळयानाच्या यशानंतर अमेरिकेतील अत्यंत जटिल रॉकेट मोहिमेचा विकास करणाऱ्या तज्ज्ञांनी हिंदुस्थाननं त्यांच्यासोबत अंतराळ तंत्रज्ञानाच्या गोष्टी शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली.

काळ बदलला आहे आणि हिंदुस्थान सर्वोत्तम उपकरणे आणि रॉकेट तयार करण्यास सक्षम आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं आहे, अशी माहिती त्यांनी रामेश्वरम येथील एका कार्यक्रमात दिली.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनने दिवंगत माजी राष्ट्रपतींच्या 92व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमनाथ विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

‘आपला देश खूप शक्तिशाली राष्ट्र आहे. तुम्हाला हे लक्षात आले आहे का? ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या पातळीचा विचार केल्यास आपला देश जगातील सर्वोत्तम देश ठरतो’, असं स्पष्ट करताना इस्रोचे प्रमुख म्हणाले, ‘चांद्रयान-3 मध्ये जेव्हा आपण अंतराळ यानाची रचना आणि विकास केला तेव्हा जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी मधील नासाच्या तज्ज्ञांना आमंत्रित केले. जेपीएल ही अशी संस्था आहे जे सर्व रॉकेट आणि अत्यंत जटील मिशन करतात’.

ते पुढे म्हणाले, ‘नासा-जेपीएलचे सुमारे पाच ते सहा लोक (इस्रोच्या मुख्यालयात) आले आणि आम्ही त्यांना चांद्रयान-3 बद्दल समजावून सांगितलं. ते सॉफ्ट लँडिंग होण्यापूर्वी (23 ऑगस्ट रोजी) आले होते. आपण ते कसे डिझाइन केले आणि आपल्या अभियंत्यांनी ते कसे बनवले आणि आपण चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरणार आहोत हे आम्ही स्पष्ट केलं आणि त्यांनी फक्त सांगितले, ‘आम्ही काय बोलणार. सर्व काही अगदी बरोबर होणार आहे’.

JPL ही संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आहे जी नासा द्वारे अर्थसहाय्यित आहे आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (CALTECH) द्वारे व्यवस्थापित केली जाते.

‘त्यांनी (अमेरिकेच्या अंतराळ तज्ज्ञांनी) एक गोष्ट देखील सांगितली, ‘वैज्ञानिक उपकरणे पहा, ती खूप स्वस्त आहेत. तयार करणे खूप सोपे आहे आणि ते प्रगत आहेत. तुम्ही ते कसे बांधले? तुम्ही हे अमेरिकेला का विकत नाही, असं ते विचारत होते’, अशीही माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, हिंदुस्थाननं 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 च्या लँडरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या लँडिंग केलं, अमेरिका, चीन आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा पराक्रम करणारा तो केवळ चौथा देश बनला.