छगन भुजबळ पुन्हा पक्ष बदलणार? अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

bhujbal

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात भुजबळ यांनी शड्डू ठोकला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. महाराष्ट्रभर त्यांनी ओबीसी समाजाचे एल्गार मेळावेही घेतले. आता राज्य सरकारने जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही भुजबळ यांनी मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदारांनी त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची भाषा केली. अशातच आता भुजबळ पुन्हा पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढली. यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला असून त्यासंदर्भात ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. छगन भुजबळ यांनीही याविरोधत दंड थोपटले आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता भुजबळ भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केली आहे.

अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची पोस्ट केली आहे. भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यामुळे भुजबळ पुन्हा पक्ष बदलणार असल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी आजपर्यंच चार वेळा पक्ष बदलला आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे भुजबळ 1991मध्ये काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेत अजित पवार गटाला पाठिंबा दिला.

काँग्रेसलाही धक्का?

दरम्यान, मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील वांद्रे-पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार झिशान सिद्दिकी आणि त्यांचे वडील, माजी मंत्री बाबा सिद्दिकी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या आहेत.