छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला नव्या वर्षाचा मुहूर्त!

 जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला नव्या वर्षाचा मुहूर्त आहे. देशातील सर्वात जुने रेल्वे टर्मिनस असलेल्या सीएसएमटीचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात येणार असून येथे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. त्याचे प्रत्यक्ष काम जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर बूटपॉलिशचे काम करणाऱया कर्मचाऱयांना तर्पन-संवेदना फाऊंडेशनच्या वतीने बूटपॉलिशच्या किटचे वाटप रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. सीएसएमटी स्थानकाचा कायापालट लवकरच होणार आहे. त्यासाठी 2 हजार 400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतीला धक्का लागू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सीएसएमटीबरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

बूटपॉलिशवाल्यांना स्वयंसहाय्यता निधीतून मदत 

तर्पन-संवेदना फाऊंडेशनकडून मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांना बूटपॉलिश किट देण्यात येणार असून त्याची सुरुवात आज सीएसएमटी स्थानकातून झाली. यावेळी बोलताना बूटपॉलिशवाले स्थानकात येणाऱयांची चरणसेवा करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान स्वयंसहाय्यता निधीतून मदत केली जाईल, असे दानवे यांनी सांगितले. या वेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार श्रीकांत भारतीय, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी, डीआरएम रजनीश गोयल आदी उपस्थित होते.

लातूरमध्ये 400 वंदे भारतची बांधणी करणार

सध्या देशात वंदे भारत ट्रेनला नागरिकांची मोठी पसंती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वंदे भारत ट्रेन उपलब्ध व्हाव्यात म्हणून रेल्वेच्या लातूर येथील कारखान्यात 400 वंदे भारत ट्रेनची बांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरव्हीएनएलने एका रशियन कंपनीसोबत करार केला असून लवकरच प्रत्यक्ष वंदे भारतची निर्मिती सुरू होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले