GST च्या माध्यमातून लूट सुरू असताना सरकार जनतेला म्हणते, ‘आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो!’

देशातील 88 टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच क्षेत्रात अत्यंत कमी आहे. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण ते ओबीसी नाहीत, ते जनरल कोट्यातले होते. गुजरात सरकारने कायदा बदलला त्यानंतर ते ओबीसी झाले. पण महत्वाचा प्रश्न आहे की, नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले? जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची लूट सुरु आहे आणि भाजपा सरकार मात्र तुम्हाला म्हणते, ‘आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, और भूके मर जावो’ असा प्रहार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यातील वाडा येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानमध्ये 88 टक्के लोकसंख्या ओबीसी, दलित, आदिवासी, मागास समाजाची आहे परंतु विविध क्षेत्रातील त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे. न्याय पालिकेतही वरच्या पदावर या समाज घटकातील लोकांची संख्या कमी आहे. 6 टक्के लोकांच्या हातात न्यायालय, मीडिया, पैसा, सत्ता आहे. जमीन अधिग्रहण करताना गरीब समाज घटकांची जमीन घेतली जाते पण अदानीची एक इंचही जमीन घेतली जात नाही.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही तर कंपन्यांना होत आहे. केंद्र सरकार 16 पिक विमा कंपन्यांना 35 हजार कोटी रुपये देते हा जनतेचा पैसा आहे. 88 टक्के लोकांच्या जीएसटीमधून हा पैसा दिला जातो. मात्र अवकाळी पाऊस, गारपीटीने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. सरकारी कंपन्यामध्ये जनतेची भागिदारी होती पण आता सरकारची कामेसुद्धा खाजगी कंपन्यांकडूनच केली जातात त्यामुळे 88 टक्के समाज घटकांचे प्रतिनिधित्व दिसत नाही. समाजाला मेहनत मजदुरीची कामे करावी लागतात पण ज्या दिवशी हा समाज जागा होईल त्यादिवशी देश हादरेल.

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास दिवासींना जमीन पट्टे दिले जातील, जेथे 50 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे तेथे 6 वे शेड्युल लागू केले जाईल म्हणजे स्थानिक सरकार, गावाच्या हातातच सर्व अधिकार असतील. प्रशासन व विविध क्षेत्रातील ही विषमता दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे आणि काँग्रेसचे सरकार आल्यास जातनिहाय जनगणनाही केली जाईल, असे आश्वासन देत तुमच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवायला शिका, जागे व्हा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

इलेक्टोरल बॉण्ड हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊत यांचा घणाघात

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात सकाळी मोखाड्यातील हनुमान मंदिरापासून झाली. जव्हार येथील विजय स्तंभाला राहुल गांधी यांनी अभिवादन केले. वाडा येथे सभेला संबोधित केले दुपारनंतर यात्रा खुडूस गावापासून पुन्हा सुरु होऊन ठाण्यात प्रवेश करेल व भिवंडीच्या आनंद दिघे चौकात जनसभा होईल. यात्रेचा आजचा मुक्काम सोनाळे मैदान येथे होणार आहे.