हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक, 5 राज्यांत होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार

काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक आजपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. ही बैठक काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये तेलंगाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होणार आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती, निवडणुकांसाठीची इंडिया आघाडी आणि काँग्रेसची ताकद याचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती इंडिया आघाडीच्या समितीलाही देणार असल्याचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. निवडणुका वेळेवर होतील अशी आशा असून यासाठी 6-9 महिन्यांचा अवधी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकार वेळेच्या आधीदेखील निवडणुका घेण्याची शक्यता असून निवडणुका कधीही झाल्या तरी आपण त्यासाठी तयार असणे गरजेचे असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीला घमंडिया म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांवरही थरूर यांनी टीका केली. इंडिया आघाडीला घमंडिया म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला अहंकार स्पष्टपणे दिसत असून या अहंकारापोटीचे ते ही टीका करत असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीच्या नावामुळे सत्ताधारी अस्वस्थ झाल्याचे हे लक्षण असल्याचेही थरूर यांनी म्हटले. या नावामुळे मोदी सरकारने ‘भारत’ या नावावर हल्ली जोर दिला असल्याचे पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे संविधानात आधूपासून आहेत. त्यातले एक नाव वापरले तर हरकत काय आहे असा सवालही थरूर यांनी विचारला आहे.